मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेत जनतेला दिलासा दिला आहे. याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना, नव्या शिंदे-फडणवीस सरकारने याबाबत सविस्तर माहिती दिली. मात्र, यावेळी देवेंद्र फडणवीस यांना एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या (Presidential Election 2022) उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना मुंबई दौऱ्याविषयी विचारण्यात आले. यावर, द्रौपदी मुर्मू मातोश्रीवर जाणार नसल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार का, यावरून बरीच उलट-सुलट चर्चा झाल्यानंतर खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या भावनेचा आदर करून द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. यानंतर आता द्रौपदी मुर्मू मुंबई दौऱ्यावर असून, उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, द्रौपदी मुर्मू मातोश्रीवर जाण्याची शक्यता धुसर असल्याचे सांगितले जात आहे.
द्रौपदी मुर्मू मातोश्रीवर जाणार नाही
भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, द्रौपदी मुर्मू मुंबईत येत आहेत. मात्र, त्यांची जी कार्यक्रम पत्रिका मला मिळालेली आहे, त्यामध्ये तरी मातोश्रीवर जाण्याबाबत नियोजन करण्यात आलेले नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, द्रौपदी मुर्मू यांच्या या दौऱ्यादरम्यान भाजप, शिंदे गटासह अनेक नेते त्यांना भेटणार आहेत. तसेच अनेक खासदारही मुर्मू यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान, शिवसेना कोत्या मनाची नाही. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे आमच्या पक्षातील आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नेत्यांनी एका आदिवासी उमेदवाराला देशाचे राष्ट्रपतीपद भूषवण्याची संधी मिळत असल्यामुळे आपण पाठिंबा द्यायला हवा अशी विनंती माझ्याकडे केली. शिवसेनेने याआधीही पक्षीय अभिनिवेशन बाजून ठेवून प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.