'गुगल'वर अजूनही देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 10:45 PM2019-11-22T22:45:49+5:302019-11-22T22:46:07+5:30
सत्ता स्थापनेची कोंडी न फुटल्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू
मुंबई : सत्ता स्थापनेची कोंडी न फुटल्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपालांकडे गेली आहे. मात्र, गुगलने अद्याप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचे म्हटले आहे. गुगलवर 'cm maharashtra' असे सर्च केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे नाव येते. तसेच, गुगलवर त्यांचा फोटो सुद्धा दिसत आहे.
राज्यातील १३ व्या विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबरला संपला. विधानसभा बरखास्त होत असताना राज्यातील सरकारचा कार्यकाळही संपुष्टात येतो. त्यामुळे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यात नवे सरकार बनेपर्यंत 'काळजीवाहू' मुख्यमंत्री म्हणून होते. मात्र, सत्ता स्थापनेची कोंडी न फुटल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे मंत्रिमंडळ बरखास्त झाले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता माजी मुख्यमंत्री आहेत.
दरम्यान, विधानसभा निकालानंतर सरकार स्थापन करण्यास भाजपाने असमर्थता दर्शविली. त्यानंतर शिवसेनाही राज्यात सत्ता स्थापनेचा दावा करू शकली नव्हती. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेस पाचारण केले होते. पण राष्ट्रवादीनेही सत्ता स्थापन करण्यात असमर्थता दर्शवल्याने राज्यपालांनी केंद्राकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली आहे.