Join us

“संभाजीनगर, धाराशीव, दि.बा.पाटील नावांच्या प्रस्तावाला समर्थन, पण...”: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 5:07 PM

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयावरून मविआ सरकारवर टीकास्त्र सोडले.

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या मोठ्या बंडानंतर राज्यात पराकोटीचा सत्तासंघर्ष आठवडाभरापासून पाहायला मिळाला. यानंतर अखेरीस उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर भाजप आणि शिंदे गटाने बहुमत सिद्ध करून नवीन सरकार स्थापन करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी मोठी घोषणा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. 

जवळजवळ १७० लोक निवडून आले होते. ही अपेक्षा होती की, भाजप-शिवसेना युतीचे सरकार तयार होईल. पंतप्रधानांनी सर्वांच्या उपस्थितीत भाजपचा मुख्यमंत्री बनेल, अशी घोषणाही केली होती. परंतु, दुर्दैवाने निवडणुकीचे निकाल आल्यानंतर तेव्हाचे आमचे मित्र शिवसेना आणि शिवसेनेचे नेते यांनी वेगळा निर्णय घेतला. विशेषतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आजन्म ज्यांचा विरोध केला, ज्यांनी हिंदुत्वाचा विरोध केला अशा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली आणि भाजपला बाहेर ठेवले. हा खरे तर जनमताचा अपमान. जनतेने मते महाविकास आघाडीला दिली नव्हती. भाजपा-सेना युतीला दिले होते. जनमताचा अपमान करून मविआ स्थापन केली, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

संभाजीनगर, धाराशीव, दि.बा.पाटील नामांतराच्या प्रस्तावाला आमचे समर्थन, पण...

दररोज सावरकरांचा अपमान, हिंदूंचा अपमान केला जात होता. शेवटच्या दिवशी नामांतराचा ठराव झाला. राज्यपालांनी बहुमत चाचणीचे निर्देश दिल्यानंतर औरंगाबद शहराचे संभाजीनगर, उस्मानाबाद शहराचे धाराशीव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आणला. गेल्या दीड वर्षांत यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. बहुमत चाचणीचे निर्देश देण्यात आल्यावर कोणतीही मंत्रिमंडळाची बैठक घेता येत नाही. तरीही ती घेण्यात आली. या प्रस्तावाला आमचे समर्थन आहे. मात्र, नव्याने येणाऱ्या सरकारला पुन्हा याचे निर्णय घ्यावे लागतील. कारण आधीचे निर्णय वैध नाहीत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

दाऊदशी संबंधित व्यक्ती मंत्रिमंडळात ठेवला

पायाभूत सुविधांच्या कामांना स्थगिती, विकास योजना नाही आणि प्रचंड भ्रष्टाचार पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या इतिहासात दोन मंत्री भ्रष्टाचाराकरिता जेलमध्ये जाणं अत्यंत आश्चर्याची, खेदजनक गोष्ट होती. एकीकडे बाळासाहेबांनी सातत्याने देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला. दुसरीकडे, त्याच्याशी संबंधित असलेला म्हणून मंत्री जेलमध्ये जातो, तरी मंत्रिपदावरून काढण्यात आले नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ज्यावेळी हे सरकार गेले, तेव्हा महाराष्ट्राला एक पर्यायी सरकार देण्याची गरज होती. हे सरकार कधीही पडेल, असे सांगायचो. लोकांच्या डोक्यावर निवडणुका लादणार नाही, पर्यायी सरकार देऊ, असे म्हणायचो. शिवसेनेचा विधिमंडळ गट, भाजपचा विधिमंडळ गट आणि १६ अपक्ष आणि छोट्या पक्षांचे आमदार असा मोठा गट सोबत आलेला आहे. अजून काही लोक येत आहेत. यांचे पत्र राज्यपालांना दिले आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  

दरम्यान, कनाथ शिंदे शिवसेनेचे गटनेते आहेत. शिवसेनेच्या आमदारांची मोठी कुचंबणा झाली. ज्यांच्याशी लढलो त्यांच्यासोबत जायचे. रोज अपमान होत असेल तर कशाच्या भरवशावर लढायचे. आमचे हरलेले विरोधकांना रोज निधी दिला जात असेल तर लढायचे कसे?  हे लक्षात आल्यावर यांनी निर्णय घेतला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची युती तोडा. मात्र, दुर्दैवाने या आमदारांऐवजी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी-काँग्रेसच्या आमदारांची कास धरून ठेवली, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.  

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळदेवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदेमहाविकास आघाडी