हे बेवड्यांसाठी समर्पित सरकार; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 05:36 AM2022-03-03T05:36:21+5:302022-03-03T05:37:25+5:30
अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारचे काळे काम बाहेर काढू, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल करताना दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :महाविकास आघाडीचे सरकार हे राज्यातील आतापर्यंतचे सर्वात भ्रष्टाचारी सरकार आहे. परीक्षांचे घोटाळे संपले नाहीत. ऊस गाळप, वीज, मराठा आणि ओबीसी आरक्षणाचे प्रश्न सुटलेले नाहीत. सरकारला फक्त दारू उत्पादन करणारा घटक जवळचा वाटतो. त्यामुळे हे बेवड्यांना समर्पित सरकार आहे. बेवड्यांसाठी जेवढे निर्णय घेतले, तेवढे शेतकरी आणि बारा बलुतेदारांसाठी घेतलेले नाही. त्यामुळे या अधिवेशनात सरकारचे काळे काम बाहेर काढू, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राज्य सरकारवर हल्लाबोल करताना दिला.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी भाजप आणि मित्रपक्षांची बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी सरकारवर टीका केली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह भाजप आणि मित्र पक्षांचे आमदार उपस्थित होते. सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकल्याची घोषणा करतानाच राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक भूमिका घेणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले.
मुंबई स्फोटातील आरोपी आणि दाऊद इब्राहिमच्या सहकाऱ्यांशी थेट व्यवहार करून ‘मनी लाँड्रिंग’ केल्याने नवाब मलिक यांना अटक झाल्यावर अख्खे राज्य सरकार त्यांच्या पाठिशी उभे राहिले. मुंबईच्या खुन्याशी व्यवहार करणाऱ्यांना वाचवायला हे सरकार पुढे आले आहे. देशात असे कधी घडले नाही. अनिल देशमुख, संजय राठोड यांचे राजीनामे घेतले गेले. पण, मलिक यांचा राजीनामा न घेऊन एका विशिष्ट समाजाला सिग्नल देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. सरकार मलिकांचा राजीनामा घेणार नसेल तर हे सरकार देशद्रोह्यांना समर्पित आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.
मलिकांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणारच. पण, आम्हाला सभागृहातील चर्चेत अधिक रस आहे. राज्यातील अनेक मुद्दे मांडणार आहोत. त्याशिवाय, लवासाबाबतही सभागृहात प्रश्न मांडणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
- स्वत: अन्याय करायचा, विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करायचे, राजकीय आंदोलनातही गंभीर कलमे लावायची आणि वर अन्याय झाला म्हणून कांगावा करायचा, असे हे कांगावेखोर सरकार राज्यात आहे.
- महाराष्ट्र झुकणार नाही, असा यांचा डायलॉग आहे. पण, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. इथली बारा कोटी जनता महाराष्ट्र आहे. ही जनता तुम्हा अहंकाऱ्यांना झुकवून दाखवेल, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.