पोटनिवडणुकीवरुन फडणवीस पेचात, उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर राजकीय मंथन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 10:30 AM2022-10-17T10:30:07+5:302022-10-17T10:32:31+5:30
आधी राज ठाकरेंचं पत्र, त्यानंतर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही पत्र लिहून पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घ्यावी, अशी केलेली विनंती.
मुंबई - आगामी महापालिका निवडणुका आणि आताची अंधेरी पूर्वची पोटनिवडणुकीवरून शिवसेना आणि भाजप-शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून भाजपने पोटनिवडणूक लढवू नये, असे आवाहन केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे म्हटले. या सर्वच घडामोडींमुळे भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच पेचात पडले आहेत.
आधी राज ठाकरेंचं पत्र, त्यानंतर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही पत्र लिहून पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घ्यावी, अशी केलेली विनंती. तर, गोपीनाथ मुंडेंच्या मतदारसंघाचा दाखला देत शरद पवार यांचेही भाजपला पोटनिवडणूक न लढविण्याबाबत आवाहन करण्यात आले. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले आहेत. शरद पवारांनी अंधेरी पोटनिवडणुकीबाबत पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले आहेत, ते कौतुकास्पद आहेत. त्यामुळे शरद पवारांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा जपला आहे, त्यासाठी शिवसेना कुटुंब त्यांची सदैव आभारी राहील, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे आता भाजप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रात्री तातडीची बैठकही घेतली.
अंधेरी पोटनिवडणुकीत चांगलेच ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. राज ठाकरेंच्या विनंतीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी मी त्यांच्या विनंतीचा आदर करतो. पण, आता हा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही. मला शिर्ष नेतृत्वाशी चर्चा करावी लागेल, असे म्हटले होते. मात्र, एकापाठोपाठ एक पत्र आणि आवाहन येत असल्याने आता फडणवीस चांगलेच पेचात पडले आहेत. येथील निवडणुकीतून माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे, ही डोकेदुखी आणखी वाढली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'मेघदूत' बंगल्यावर रविवारी रात्री उशिरा बैठक झाली. या बैठकील मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार मुरजी पटेल (Muraji Patel) उपस्थित होते. मुरजी पटेल हे निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगितलं जात आहे. आपली पूर्ण तयारी झाल्याचं पटेल यांनी सांगितलं. तर आशिष शेलार यांचाही पोटनिवडणूक लढवण्याचा आग्रह आहे. पटेल विजयी होतील, असा विश्वास त्यांनाही वाटतो.
दरम्यान, आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने भाजपकडून अद्यापही मंथन सुरू आहे. याबाबत दुपारपर्यंत निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.