Join us

"फडणवीसांचे मराठा समाजावर अनंत उपकार, जरांगेंनी नौटंकी बंद करावी"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 4:01 PM

मुंबई - राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संतप्त होत उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. ...

मुंबई - राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संतप्त होत उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. मला सलाईनच्या माध्यमातून विषप्रयोग करुन संपवण्याचं कारस्थान असल्याचा गंभीर आरोपही जरांगे यांनी केला आहे. तसेच, काही लोकांना पुढे करुन मला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. मला संपवण्याचं कटकारस्थान होतं. त्यामुळे, आता मीच मुंबईतील सागर बंगल्यावर येतो, असे म्हणत जरांगे आपल्या जागेवरुन उठले अन् गाडीत बसून मुंबईकडे निघाले आहेत. जरांगे यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपा आमदारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. आमदार प्रसाद लाड, आ. नितेश राणे आणि आ. अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

अंतरावालीत जरांगे अधिक आक्रमक झाले असून जरांगेंना सहकाऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते सागर बंगल्याकडे जातोय म्हणत ते सुरुवातीला चालत निघाले, त्यानंतर गाडीत बसले असून मुंबईकडे जाण्यावर ठाम असल्याचं म्हटलं. जरांगेंच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपा नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. जरांगेंनी आता नौटंकी बंद करावी, असे आमदार प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. तसेच, देवेंद्र फडणवीसांचेमराठा समाजावर अनंत उपकार असून १० टक्के आरक्षण मिळाल्यानंतर मराठा समाज खूश असल्याचंही आमदार लाड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले.   

''समाजाच्या नावाखाली मागच्या सात-आठ महिन्यात स्वत:चा राजकीय वरदहस्त करण्याचा प्रयत्न जरांगे पाटील करत होते, त्याच्यामागचा बोलवता धनी कोण आहे, हे त्यांनी सांगावं. सिल्व्हर ओक आहे की जालन्यातील भैय्या फॅमिली आहे, हे आता लोकांसमोर यायला लागलं आहे.'', असे प्रसाद लाड यांनी म्हटले. तसेच, ''तुम्हाला १० वेळा सांगितलं होतं की, फडणवीसांचे नाव घेऊ नका. ज्या फडणवीसांचे मराठा समाजावर अनंत उपकार आहेत. ज्या फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. त्या फडणवीसांचं सारखं सारखं नाव घ्यायला तुम्हाला कोण लावतंय हे आज जनतेसमोर आलं आहे,'' असे म्हणत आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे यांच्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित करत त्यांना फटकारलं. 

जरांगेंनी नौटंकी बंद करावी

मराठा समाजाला १० टक्के आरक्षण मिळाल्यानंतर तुमची खेळलेली खेळी संपली हे आजच्या तुमच्या पत्रकार परिषदेतून तुमची परिस्थिती लक्षात येते. समाजाच्या नावावर लेकरू लेकरू करुन ढेकरु द्यायचं बंद करा, समाजाला माहिती पडलंय, समाजाला १० टक्के आरक्षण देण्यात आलंय, समाज खुश आहे. तुमच्या आयडिया आणि अॅडव्हाईसची समाजाला गरज नाही, असेही आमदार प्रसाद लाड यांनी जरांगेंना उद्देशून म्हटले. तसेच, त्यांनी नौटंकी बंद करावी, असेही आमदार लाड यांनी म्हटले. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमराठामराठा आरक्षणमनोज जरांगे-पाटीलप्रसाद लाड