शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा; कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवली!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2018 04:41 PM2018-03-31T16:41:39+5:302018-03-31T16:45:47+5:30
'वन टाइम सेटलमेंट'ची मुदतही सरकारने ३० जूनपर्यंत वाढवली आहे.
मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत देण्यात आलेली ही मुदत आता १४ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून ही घोषणा केली आहे. 'वन टाइम सेटलमेंट'ची मुदतही सरकारने ३० जूनपर्यंत वाढवली आहे.
CM @Dev_Fadnavis extends date for online submission of applications by farmers for Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari sanman Yojana (historic loan waiver) from 31 March to 14th April 2018
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 31, 2018
Extension also given for availing benefits of OTS under this scheme upto 30 June 2018
गेल्या वर्षी जून महिन्यात राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत, १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत कर्जमाफी व १ लाख ५० हजार रुपयांवरील शेतकऱ्यांना एक वेळ समझोता योजना लागू करण्यात आली होती. तसेच २०१५-१६, २०१६-१७ या वर्षांत ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमितपणे परतफेड केली, अशा शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचेही घोषित केले होते. कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचं आवाहन सरकारनं शेतकऱ्यांना केलं होतं. त्यासाठी ३१ मार्चची मुदत देण्यात आली होती. परंतु, ही मुदत १४ दिवसांनी वाढवण्यात आली आहे.
शेतकरी सन्मान योजनेसंदर्भातील ठळक मुद्देः
>> ३४ हजार कोटींची कर्जमाफीला कॅबिनेटची मंजुरी
>> ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी, दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ
>> या निर्णयामुळे ९० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार
>> ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे त्यांचे मध्यम मुदतीचे कर्ज देखील माफ
>> या निर्णयामुळे ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार
>> ६ टक्के शेतकऱ्यांना ओटीएसखाली आणणार
>> पीककर्जासोबत मध्यम कर्जही माफ टर्म लोन माफ
>> कर्जमाफी ही 'छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना' या योजनेनं ओळखली जाणार
>> राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना लाभ नाही