Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी किशोरी पेडणेकरांना दिली गोवा टू मुंबई लिफ्ट, राजकीय प्रवासाची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 12:25 PM2022-02-07T12:25:09+5:302022-02-07T12:26:14+5:30
'इतर वेळी एकमेकांवर टीका करणारे राजकारणी गरज पडल्यावर एकमेकांच्या मदतीला येतात, याचाच प्रत्यय गोव्यात आला.'
मुंबई: शिवसेना आणि भाजप यांची युती तुटल्यापासून दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसतात. दोन्ही पक्षाचे वैर इतके वाढले आहे की, कधीकधी नेते एकमेकांचे तोंडसुद्धा पाहत नाहीत. पण, सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच प्रसंगाची चर्चा रंगली आहे. इतर वेळी एकमेकांवर टीका करणारे राजकारणी गरज पडल्यावर एकमेकांच्या मदतीला येतात, याचाच प्रत्यय गोव्यात आला.
शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) गोव्यात प्रचारासाठी आल्या होत्या. पण, अचनाक लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी आली आणि त्यांना मुंबईला जावे लागले. पण, पणजीतून मुंबईकडे येण्यासाठी सकाळी फ्लाईट नव्हती. यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) त्यांच्या चार्टर प्लेनंने मुंबईकडे येत असल्याचे त्यांना समजले.
यानंतर पेडणेकरांनी फडणवीसांसी संपर्क साधला आणि गोव्यातून मुंबईला जाण्यासाठी लिफ्ट देण्याची विनंती केली. देवेंद्र फडणवीसांनीहीकिशोरी पेडणेकरांची विनंती मान्य केली आणि त्यांना मुंबईपर्यंत लिफ्ट दिली. देवेंद्र फडवणीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत अणि गिरीश महाजन यांच्यासोबत मुंबईला आले. त्यांच्यासोबत महापौर किशोरी पेडणेकरही मुंबईपर्यंत आल्या. गरजेच्या वेळी राजकारणी एकमेकांना मदत करतात, हे या प्रसंगावरुन दिसून आले.