मुंबई
ईडीच्या कोठडीत असलेले राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज आक्रमक झाले. मुंबईच्या खुन्यासोबत व्यवहार केलेल्या मंत्र्याला पाठिशी घालून ठाकरे सरकार काय सिद्ध करु पाहातंय? मुंबईच्या खुन्यासोबतचा व्यवहार महाराष्ट्र कधीच खपवून घेणार नाही. दहशतवाद्याशी संबंधित जमिनीचा व्यवहार करुन त्याला सहकार्य करायचच कशाला? असे सवाल उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्याच्या अधिवेशनात मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा पक्ष संघर्ष करेल असंही ते म्हणाले. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.
ज्या सरकारमध्ये दाऊदप्रती सहानुभूती ठेवणारे लोक ठेवले आहे, त्या सरकारच्या चहापानाला आम्ही जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असंही फडणवीसांनी यावेळी जाहीर केलं. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच एका मुलाखतीत "तुम्ही देशातली सत्ताही घेतली, महाराष्ट्रातलीही तुम्हाला हवी, ग्रामपंचायत, सोसायट्याही तुम्हाला हव्यात, मग आम्ही धुणीभांडी करायची का?", असा टोला भाजपाला लगावला होता. त्यावरही फडणवीसांनी आज प्रत्युत्तर दिलं.
"त्यांनी काय करायचं हे त्यांनी ठरवावं. पण त्यांच्यातले काही लोक दाऊदकडची धुणीभांडी करतायत. ती आधी बंद करायला लावा. दाऊदपुढे झुकणार आणि महाराष्ट्र झुकणार नाही ही जी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतेय, ती आधी बंद झाली पाहिजे. माझं आव्हान आहे की जशी माझी पत्रकार परिषद चालते, तशी त्यांचीही घ्या. त्यांच्याकडूनही उत्तरं येऊ देत. फिक्समॅच घेऊ नका", असं फडणवीस म्हणाले.
ठाकरे सरकार हे सावकारी सरकार, अजित पवारांच्या शब्दाला किंमत नाही"राज्यात आज अनेक प्रश्न आहेत आणि आम्ही अधिवेशनात चर्चा करण्यासाठी तयार आहोत. राज्यातील अनेक मुद्दे मांडण्याची आमची तयारी आहे. पण सरकारनंही हे अधिवेशन नीट सहकार्यानं चालवायला हवं. राज्यातील शेतकऱ्यांचे वीज मीटर कापले जात आहेत. राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी याआधीच्या अधिवेशनात शेतकऱ्यांचे वीज मीटर कापले जाणार नाहीत असा शब्द दिला होता. त्यानंतर मीटर कापावे लागतील असे शेवटच्या दिवशी म्हणाले. म्हणजेच त्यांच्या शब्दाला सरकारमध्ये काहीच किंमत नाही हे सिद्ध झालं आहे. ठाकरे सरकार हे सावकारी सरकार आहे", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बेवड्यांना समर्पित सरकारमहाविकास आघाडी सरकार हे फक्त बेवड्यांसाठी काम करतं. मद्य व्यवसायाला हवा तसा पाठिंबा देतं. हे सरकार बेवड्यांना समर्पित असलेलं सरकार आहे, असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात आजवरचा सर्वात मोठा भ्रष्टाचार ठाकरे सरकारच्या काळात झाला आहे, असाही दावा फडणवीसांनी यावेळी केला. तसंच राज्याच्या इतिहासात ठाकरे सरकारची ओळख आजवरचं सर्वात भ्रष्टाचारी सरकार अशी नोंद केली जाईल, असंही ते म्हणाले.