मुंबई - जालन्यातील मराठा आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर आता राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी गावातील आंदोलनाल जवळपास सर्वच राजकीय पक्षाच्या बड्या नेत्यांनी भेटी दिल्या आहेत. त्यामध्ये, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरेंनीही भेट दिली. उद्धव ठाकरेंनी येथे भेट दिल्यानंतर राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. अख्खा महाराष्ट्र मी इथं आणून उभा करेन, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी सरकारला दिला होता. तसेच, सरकारने मराठा आरक्षणासाठी वटहुकून का काढला नाही, असा सवालही त्यांनी केला.
उद्धव ठाकरेंच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून उत्तर दिलंय. अध्यादेश काढून जर टिकणारे मराठा आरक्षण देता आले असते तर मग उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अध्यादेश का काढला नाही, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना केला होता. त्यावर आता उद्धव ठाकरेंनी प्रखर शब्दात टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीसांचं ज्ञान एवढं तोकडं असेल असा मला वाटलं नाही. कारण, वटहुकूम काढण्याचा अधिकार संसदेला आहे. दिल्लीतील वटहुकून हा दिल्ली सरकारने फिरवला का नाही, तो केंद्राने फिरवला. हा अधिकार केंद्राला आहे. देवेंद्र यांना मी थोडंतरी समजत होतो, पण आता असं वाटतंय की, ते मंत्रालयाच्या आजुबाजूला फिरकण्याच्याही कुवतीचे नाहीत, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध जर वटहुकून राज्य सरकार काढायला लागली तर, त्यांनी घटनेचा अभ्यास केलेलाच नाही, असे पलटवार उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केला आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
मराठा आरक्षणाचा कायदा आपण तयार केला. उच्च न्यायालयात केवळ दोन कायदे टिकले. एक महाराष्ट्राचा आणि दुसरा तमिळनाडूचा.उच्च न्यायालयात टिकलेल्या कायद्याला सुप्रीम कोर्टात कधीच स्थगिती मिळत नाही. पण गेल्या सरकारने असे प्रताप केले की त्याला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाली आणि पुढे त्यांच्याच काळात तो रद्द झाला.