मुंबई- मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचा चेहरा देवेंद्र फडणवीस हाच असणार आहे. फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत मुंबईच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली. वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प मार्गी लावले. त्यांनी केलेल्या विकासकामांचे उद्घाटन करण्याचे काम गेली दोन वर्षे महाविकास आघाडीचे सरकार करत आहे; पण ते फीत कापत असले तरी काम कोणी केले, हे मुंबईकरांना माहीत आहे.
मुंबईचा बदलता चेहरामोहरा, इथले जीवनमान उंचावणारे प्रकल्प फडणवीस सरकारच्या काळातील कामे आहेत. एका अर्थाने मुंबईचा विकासपुरुष म्हणून फडणवीस यांची कारकीर्द राहिली. त्याच आधारावर आणि त्यालाच केंद्रबिंदू ठेवून आम्ही मुंबई पालिका निवडणुकीत उतरणार आहोत, अशी भूमिका भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी मांडली.
प्रभाग रचना अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिवसेनेने स्वतःच्या सोयीने रचना केल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्याचे पुढे काय झाले ?
स्वतःच्या राजकीय सोयीची प्रभाग रचना लादण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे. पालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी हे काम करायचे असते त्यांनासुद्धा प्रभागातील बदलांची प्रक्रिया माहीत नाही, हे वास्तव आहे. शिवसेनेच्या दोन नेत्यांनी, मंत्र्यांनी आपल्या घरी बसून प्रभाग रचनेत बदल केले आहेत आणि ते प्रशासनाला सोपविले आहेत; पण याविरोधात मुंबई भाजप ७० हजार हरकती, आक्षेप नोंदविणार आहे.
नव्या प्रभाग रचनेचा भाजपला फटका बसणार?
भाजपचा पारंपरिक मतदार तोडण्याचा पूर्ण प्रयत्न शिवसेनेने केला आहे; पण तरीही भाजपला रोखण्यात सत्ताधाऱ्यांना यश येणार नाही. नव्याने बनविलेल्या ९ प्रभागांपैकी सहा प्रभाग भाजप जिंकेल. हे जमिनीवरचे वास्तव आहे.
भाजपनेही मागच्यावेळी स्वतःच्या सोयीने प्रभागांचे सीमांकन केल्याचा आरोप झाला?
देवेंद्र फडणवीसांच्या काळातील प्रभाग रचना ही नगरविकास विभागातील अधिकारी आणि तज्ज्ञांना घेऊन बनविण्यात आली होती. यात उच्च वर्ग, मध्यम आणि झोपडपट्टी अशा तिन्ही घटकांचे संतुलन साधण्यात आले होते. ज्यामुळे मुंबईचा सर्वांगीण विकास परिणामकारपणे साधला जाणार होता. आता मात्र केवळ शिवसेनेचे उमेदवार कसे निवडून येतील, भाजपचा मतदार कसा वगळला जाईल याचा विचार करून ही रचना बनविली गेली आहे. हे असे आतापर्यंत कधीच झाले नव्हते.
या निवडणुकीचे मुद्दे काय असतील? टिपू सुलतान नामकरण, हिजाबचे विषय तर सुरू झालेच आहेत?
पालिकेतील शिवसेनेचा भ्रष्टाचार हाच यंदाच्या निवडणुकीचा मुद्दा असणार आहे. कोविडच्या काळात भ्रष्टाचार झाला. रस्त्यावरचे खड्डे तसेच आहेत. नळपाणी योजनेत भ्रष्टाचार, राणी बाग आणि पेंग्विनचे प्रकरण आहेच. नालेसफाई, मिठी नदीचा मुद्दा अनेक वर्षे तसाच आहे. एसटीपी प्लांट कार्यान्वित नाहीत, त्यामुळे दर महिन्याला साडेचार कोटींचा दंड भरावा लागतोय. सामान्य मुंबईकरांचा हा पैसा आहे. केवळ कंत्राट कोणाला द्यायचे यावरून हे काम थांबले आहे. साडेबारा हजार कोटींचे कंत्राट ३३ हजार कोटींवर गेले तरीही काम सुरू करता येत नाही. यातच भ्रष्ट कारभार उघड होतो.
मुंबई भाजपचा कारभार नक्की पाहते कोण, हाच प्रश्न आता आहे. कधी प्रभारी नेमले जातात, आता संचालन समिती बनविली. नेतृत्वाबाबत इतका गोंधळ का?
अजिबात गोंधळ नाही. मुंबईत आमचे सामूहिक नेतृत्व आहे. इतकी सशक्त टीम संच सध्या कुठेच नाही. प्रत्येकाचे स्वतंत्र बलस्थान आहे. त्यामुळे सगळे मिळून विजयाच्या ध्येयाने आम्ही काम करतोय. देवेंद्र फडणवीस यांचा नेतृत्वात, त्यांचा चेहऱ्यावर आम्ही ही निवडणूक लढवीत आहोत. त्यामुळे विजय निश्चित आहे.