Join us  

Chitra Wagh BJP vs Goa Congress: 'गोवा तो झांकी है, राजस्थान छत्तीसगढ़ बाकी है।', भाजपाचा काँग्रेसला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 3:43 PM

गोव्यातील काँग्रेसचे ११ पैकी १० आमदार भाजपात येण्याची चर्चा

Goa Congress vs Chitra Wagh BJP: गोव्यात काँग्रेस विधिमंडळ गटात मोठी फूट पडली असून ११ पैकी १० आमदार विधिमंडळ गट भाजपात विलीन करण्याच्या तयारीत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या संबंधीच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधूनही सुरू आहेत. भाजप श्रेष्ठींकडून या विलिनीकरणाला हिरवा कंदील मिळाला असून कोणत्याही क्षणी १० आमदारांचा हा गट भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. या साऱ्या गोंधळात, महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीतून धडा घेत काँग्रेस हायकमांडने गोव्यातील आमदारांना अज्ञातस्थळी हलवले असल्याची माहिती आहे. यावरून भाजपाच्या चित्रा वाघ यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे.

'फुटीच्या भीतीने काँग्रेसने आमदारांना अज्ञातस्थळी हलवले. मुकुल वासनिक गोव्यात दाखल झाले आहेत. घराणेशाही आणि देशद्रोही शक्तिंचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन यामुळे देशभरात काँग्रेसचा डोलारा रोज पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडत आहे', अशी टीका त्यांनी चित्रा वाघ यांनी केली. तसेच, 'गोवा तो झांकी है, राजस्थान छत्तीसगढ़ बाकी है।', असा इशाराही त्यांनी ट्वीट मधून दिला.

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून (११ जुलै) सुरू झाले. या पार्श्वभूमीवर गोव्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडून देणाऱ्या हालचाली काँग्रेसच्या आमदारांमध्ये दिसून आल्या. शनिवारी या हालचालींचा सुगावा लागल्यानंतर काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडु राव तातडीने दाखल झाले. त्यांनी आमदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. परंतु विरोधी पक्ष नेते मायकल लोबो तसेच काँग्रेसचे अन्य नऊ आमदार मिळून एकूण दहा जण काँग्रेस विधिमंडळ गट भाजपात विलीन करण्याबाबत ठाम असल्याची माहिती सांगण्यात आली. मात्र, आजच्या अधिवेशनासाठी भाजपाच्या संपर्कात असलेले काँग्रेसचे पाच आमदार हजर राहिल्याने काँग्रेस त्यांचे मन वळविण्यात यशस्वी ठरल्याचे दिसत आहे.

टॅग्स :गोवाकाँग्रेसभाजपाचित्रा वाघ