मुंबई - महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन नागपूरात सुरु झाले असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या भूमिकेवरुन सत्ताधारी महायुतीवर विरोधकांनी जोरदार टीका केलीय. कारण, सत्ताधारी राष्ट्रवादी गटाच्या बाकावर नवाब मलिक बसले होते. त्यानंतर, विरोधकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. त्यामुळे, फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून भूमिका मांडली. नवाब मलिक यांना महायुतीत घेता येणार नसल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही याबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
देशद्रोहाच्या आरोपावरून शिक्षा भोगत असलेले आणि सध्या जामिनावर बाहेर असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक अधिवेशनात उपस्थित राहिले. यावेळी ते सत्ताधाऱ्यांच्या म्हणजे अजितदादांच्या गटातील आमदारांसोबत बसले. हा प्रकार पाहून विरोधकांनी गोंधळ केला आणि नवाब मलिकांबाबत काही सवाल उपस्थित केले. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. फडणवीसांच्या पत्रानंतर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी नवाब मलिक यांच्याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही नवाब मलिक यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही. विधानसभेत आल्यानंतर जुन्या सहकार्यांशी त्यांचा संवाद आणि भेट होणे स्वाभाविक आहे, असे तटकरे यांनी म्हटले.
पत्रातील मजूकर काय?
माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतु, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे, असे फडणवीसांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे, मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे. हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
पुढे फडणवीसांनी लिहिले की, त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे.