Join us  

एखाद्या गोष्टीचा कांगावा करणं ही आव्हाडांची स्टाईल, फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 5:07 PM

एखाद्या गोष्टीचा कांगावा करणे ही आव्हाडांची स्टाईल आहे. त्यामुळे, कुठल्याही गोष्टीचं उदात्तीकरण करायचा ते प्रयत्न करत असतात

मुंबई - माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह १५ जणांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने आव्हाड यांना जामीन मंजूर केला. ठाणे येथील चित्रपटगृहात प्रेक्षकाला मारहाण प्रकरणी पोलिसांनी आव्हाड यांना ताब्यात घेतले होते. त्यांना आज कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांच्या वकीलांनी त्यांना जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. अखेर जामीन मंजूर झाल्यामुळे ते तुरुंगातून बाहेर आले आहेत. याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. 

एखाद्या गोष्टीचा कांगावा करणे ही आव्हाडांची स्टाईल आहे. त्यामुळे, कुठल्याही गोष्टीचं उदात्तीकरण करायचा ते प्रयत्न करत असतात. मुळात सगळ्यांना स्पष्टपणे माहिती आहे की, आव्हाड यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह थेअटरमध्ये जाऊन तमाशा केला, जी मारहाण केली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई करण्यात आली आहे. इतर कोणीही असा प्रकार केला असता तर त्याच्यावरही अशीच कारवाई झाली असती. मात्र, आपण काहीतरी खूप मोठं केलंय, हा दाखवण्याचा त्यांचा जो नाद आहे, त्यातून या सगळ्या गोष्टी होत आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.  

दरम्यान, ऊर्जा प्रकल्प मध्य प्रदेशात गेल्यासंदर्भातही फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कुठलीही माहिती न घेता जुन्या सरकारच्या काळात गेलेले प्रकल्प हे आमच्या नावाने दाखवणं बंद केलं पाहिजे. हा संपूर्ण प्रकल्प प्रस्ताव जुन्या सरकारच्या काळात दाखल करण्यात आला आहे. मात्र, मुख्यमंत्री आणि माझे फोटो दाखवून त्याला वेगळा रंग दिला जात असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलंय. 

तुरुंगाबाहेर येताच आव्हाडांची पत्रकार परिषद

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह १५ जणांना अटी-शर्तींसह जामीनाला न्यायालयाने मंजुरी दिली आहे. १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच, पोलिसांच्या तपासात त्यांना सहकार्य करण्याची अटही न्यायालयाने त्यांना घालती असून त्यानंतरच जामीन मंजूर झाला. त्यानंतर, आव्हाड यांनी तरुंगाबाहेर येताच पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर टीका केली. तसेच, मी याप्रकरणी पोलिसांना दोष देत नाही, असेही ते म्हणाले. तर, हर हर महादेव चित्रपटातील सीनही त्यांनी पत्रकारांना दाखवला. 

टॅग्स :जितेंद्र आव्हाडदेवेंद्र फडणवीसराष्ट्रवादी काँग्रेसन्यायालय