Devendra Fadnavis: 'मुंबईत होत असलेले हल्ले हे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने', देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 02:04 PM2022-04-25T14:04:57+5:302022-04-25T14:06:20+5:30
Devendra Fadnavis News: मुंबईत भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांवर झालेल्या हल्ल्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil ) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या घडामोडींमुळे राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. दरम्यान, मुंबईत भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांवर झालेल्या हल्ल्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी, त्यांच्यावर हल्ले करण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी विभाग वाटून घेतले आहेत, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईमध्ये सध्या जे काही घडत आहे त्याची सुत्रे मुख्यमंत्री कार्यालयाकडून हलवली जात आहेत. तर राज्यात इतरत्र जे काही घडतंय ते गृहमंत्री कार्यालयाकडून घडवलं जात आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी विरोधकांना नामोहरम करण्यासाठी, त्यांच्यावर हल्ले करण्यासाठी विभाग वाटून घेतले आहेत. मुंबईत मुख्यमंत्र्यांनी करायचं आणि महाराष्ट्राच्या इतर भागात गृहमंत्र्यांनी करायचं असं ठरलं आहे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
दरम्यान, सध्याचे महाराष्ट्रातील सरकार हे सर्वात असहिष्णू सरकार म्हणून त्याची इतिहासात नोंद होणार आहे. कुणीही लोकशाही पद्धतीने विरोध केला तरी पोलिसांमार्फक घरी जाऊन कारवाई केली जाते. मात्र सुदैवाने यांची एकही केस कोर्टात टिकत नाही, आता याविरोधात आम्ही संघर्ष ठरू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.