देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट; निकालापूर्वी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 12:01 AM2024-06-04T00:01:16+5:302024-06-04T00:03:19+5:30

विधानपरिषद निवडणुकीवरून दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष निर्माण झाला असून मनसेकडून कोकण पदवीधर निवडणुकीसाठी अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis meets Raj Thackeray What issues are discussed before the lok sabha election verdict | देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट; निकालापूर्वी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट; निकालापूर्वी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

Devendra Fadnavis ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास बाकी असताना भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज यांच्या भेटीसाठी देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले होते. लोकसभा निवडणुकीचा संभाव्य निकाल आणि विधानपरिषद निवडणुकीवरून निर्माण झालेले मतभेद, याबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मनसे-भाजप युतीचं हे समीकरण विधानसभा निवडणुकीतही कायम राहील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र राज्यात काही दिवसांत होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीवरून दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष निर्माण झाला असून मनसेकडून कोकण पदवीधर निवडणुकीसाठी अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर आता भाजपकडूनही निरंजन डावखरे यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर मनसेसोबतचे मतभेद दूर व्हावेत, या उद्देशाने आज फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे.

भाजपने केली आहे उमेदवारांची घोषणा 

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आटोपत असतानाच महाराष्ट्रात विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि  नाशिक शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक होत असून, या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच भाजपने तीन मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार जाहीर केले आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली आहे. तर मुंबई पदवीधर मतदारसंघात किरण शेलार आणि आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवनाथ दराडे यांना भाजपाने संधी दिली आहे. विधान परिषदेच्या या जागांसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे.
 
मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाने किरण शेलार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. किरण शेलार यांचा सामना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्याशी होणार आहे. तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघातून  भाजपाकडून शिवनाथ दराडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.  शिवनाथ दराडे यांच्यासमोर ठाकरे गटाचे ज.मो. अभ्यंकर यांचे आव्हान आहे.  
 

Web Title: Devendra Fadnavis meets Raj Thackeray What issues are discussed before the lok sabha election verdict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.