Join us

काँग्रेसच्या माजी नेत्याकडून फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख; उपमुख्यमंत्री म्हणाले, "सेन्सॉर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 12:45 PM

काँग्रेसचे माजी नगरसेवर रवी राजा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीकडून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. दुसरीकडे, उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या इच्छुकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश सुरु केला आहे. अशातच काँग्रेसचे माजी नगरसेवक रवी राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रवी राजा यांच्या रुपाने बडा नेता भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला. मुंबईत रवी राजा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी रवी राजा यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सूचक प्रतिक्रिया दिली.

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते रवी राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सायन कोळीवाडा या मतदारसंघातून रवी राजा हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र काँग्रेसने गणेश यादव यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या रवी राजा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधण्याआधी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. त्यावेळी ओळख करुन देताना रवी राजा यांनी देवेंद्र फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असा उल्लेख केला.

रवी राजा यांनी भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करताच देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करताच देवेंद्र फडणवीस यांनी हे फक्त सेन्सॉर करुन टाका असं म्हटलं. देवेंद्र फडणवीसांना बोटांनीही इशारा केल्यानंतर एकच हशा पिकला होता.

दुसरीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही एका मुलाखतीदरम्यान, २०२४ चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील असं म्हटलं. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? असा सवाल राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना राज ठाकरे यांनी देवेंद्रजी (देवेंद्र फडणवीस) होतील, असं म्हटलं. त्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्रजी होऊ शकतात पुढचे मुख्यमंत्री? आपल्याला असे वाटते? असा सवाल विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी "बिलकूल होऊ शकतात," असं म्हटलं. 

दरम्यान,, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदामध्ये रस नसल्याचे म्हटलं आहे. "मी पाच वर्षे राज्याचा मुख्यमंत्री होतो. आतापर्यंत महाराष्ट्रात फक्त दोन मुख्यमंत्र्यांनाच पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला. त्यापैकी एक म्हणजे वसंतराव नाईक आणि दुसरा म्हणजे मी. त्यामुळे आता मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न किंवा लालसा माझ्या मनात उरलेली नाही. आता मला जी जबाबदारी देण्यात येईल, त्यामध्ये मी काम करेन," असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 

टॅग्स :मुंबईदेवेंद्र फडणवीसकाँग्रेसभाजपा