फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट, विधानपरिषद निवडणुकीबाबत चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 05:27 AM2024-06-04T05:27:21+5:302024-06-04T05:30:02+5:30
सोमवारी रात्री फडणवीस अचानक राज यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.
मुंबई : लोकसभा निवडणूक निकालाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सोमवारी रात्री फडणवीस अचानक राज यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा देत राज ठाकरे महायुतीत सहभागी झाले होते. त्यांनी भाजपसाठी काही ठिकाणी प्रचारही केला. तर, महायुतीने निवडणुकीच्या केलेल्या प्रत्येक जाहिरातीत राज ठाकरेंचा फोटो वापरला होता. मात्र, लोकसभेचे मतदान पूर्ण झाल्यानंतर जाहीर झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत राज ठाकरेंनी परस्पर आपला उमेदवार उभा केला आहे. विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून अभिजित पानसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
तर, दुसरीकडे भाजपकडून या मतदारसंघातील विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांची उमेदवारी सोमवारीच जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी राज यांची भेट घेतली असण्याची शक्यता आहे. मनसेने विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेऊन भाजपला पाठिंबा द्यावा यासाठी या भेटीत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर लोकसभेचे एक्झिट पोल आणि महायुतीची लोकसभा निवडणुकीतील राज्यातील संभाव्य कामगिरी यावरही या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.