'संकटाकाळत देवेंद्र फडणवीस रस्त्यावर दिसण्यापेक्षा राजभवनात जास्त दिसतात'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 12:05 PM2020-04-29T12:05:07+5:302020-04-29T13:12:50+5:30
राज्य सरकारला यासंदर्भात जाब विचारा अशी विनंती भाजपाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य भाजपाच्या नेत्यांनी राज्यपालांची मंगळवारी भेट घेतली होती
मुंबई - राज्यात अघोषित आणिबाणीसदृश आणि अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली असून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांची मुस्कटदाबी करुन त्यांच्यात प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण केले जात आहे. कुणी आपल्या विरोधात बोलूच नये अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे असा आरोप भाजपाने केला होता. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तसे पत्रही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चांगलाच समाचार घेतलाय. राज्याचे नेतृत्व ज्यांनी गेली ५ वर्षे केलंय, त्यांनी अशी टीका करणे योग्य नसल्याचे देशमुख यांनी म्हटलंय.
राज्य सरकारला यासंदर्भात जाब विचारा अशी विनंती भाजपाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य भाजपाच्या नेत्यांनी राज्यपालांची मंगळवारी भेट घेतली होती. या भेटीवर युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी ट्विटरद्वारे अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. तर, गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.
कोरोनाच्या संकटकाळात देवेंद्र फडणवीस रस्त्यावर दिसण्यापेक्षा राजभवनात जास्त दिसतात. सध्याच्या परिस्थितीत राजकारण न करता, सर्व पक्षाच्या नेत्यांनी सहकार्य केलं पाहिजे, असा जोरदार टोला देशमुख यांनी लगावला. तसेच, एखाद्या ग्रामपंचायत सदस्याने किंवा नगरसेवकाने अशा पद्धतीने टीका केली तर समजू शकतो, मात्र राज्याचे पाच वर्षे नेतृत्व करणारे फडणवीस यांनी अशा पद्धतीने टीका करणे योग्य नाही. आपत्तीच्यावेळी राजकारण करणे हे योग्य नाही, असेही देशमुख यांनी म्हटले.
दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह इतर भाजपा नेत्यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारविरोधात तक्रार करत जाब विचारण्याची विनंती राज्यपालांना केली. राज्यपालांना लिहिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, वाधवान प्रकरणात एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी सरकारने दिलेलं पत्र सार्वजनिक केल्याने काही दिवसांतच वांद्र्यातील गर्दीचा ठपका ठेऊन त्यांना अटक करण्यात आली. मुंबईत हा गुन्हा नोंदवण्यात आला असल्याने अनेक संवेदनशील क्षेत्रातून प्रवास करुन उस्मानाबाद येथून मुंबईत आणण्यात आले. त्यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर हा संपूर्ण प्रसंग त्यांनी स्वत:च कथन केला आहे असं सांगण्यात आलं.