Join us  

Devendra Fadnavis: फडणवीसही नॉट रिचेबल... पण मीडियासाठी, सागर बंगल्यावर ठरवताहेत रणनीती

By यदू जोशी | Published: June 23, 2022 7:01 AM

Devendra Fadanvis: विधान परिषद निवडणुकीच्या आदल्या रात्री भाजपच्या आमदारांना ते एवढेच म्हणाले की उद्याची निवडणूक जिंकणे ही राज्यात आपली सत्ता येण्यासाठीची शेवटची पायरी असेल. त्यांच्या या वाक्यामागे पुढचे एवढे मोठे राजकीय स्फोट लपलेले असावेत हे आमदारांच्याही लक्षात आले नव्हते.

- यदु जोशी मुंबई : एक एक पाऊल सावधपणे टाकत असलेले विधानसभेचे विरोधी  पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या मीडियासाठी ‘नॉट रिचेबल’ असले तरी सत्तेचा नवा प्रयोग यशस्वी करण्यासाठी रणनीती आखत आहेत. अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांना सोबत घेत सत्तेच्या अध्यायाचे एकेक पान तयार करीत आहेत.मलबार हिलवर समुद्राला लागून फडणवीस यांचा सागर हा बंगला सध्या गोपनीय हालचालींचे केंद्र बनला आहे. सत्तेची स्क्रिप्ट ते लिहीत आहेत. राज्यसभा, विधान परिषदेतील विजयानंतर मुख्यमंत्रीपदावर त्यांची नजर आहे. फडणवीस-अजित पवार प्रयोग फसला. राजस्थानमध्येही आपटी खावी लागली. त्याची पुनरावृत्ती होऊ नये हे बघितले जात आहे. नियोजन त्यांनी खूप आधीपासून केलेले होते, पण कुठेही त्याची वाच्यता न करण्याचे भान त्यांनी बाळगले.

विधान परिषद निवडणुकीच्या आदल्या रात्री भाजपच्या आमदारांना ते एवढेच म्हणाले की उद्याची निवडणूक जिंकणे ही राज्यात आपली सत्ता येण्यासाठीची शेवटची पायरी असेल. त्यांच्या या वाक्यामागे पुढचे एवढे मोठे राजकीय स्फोट लपलेले असावेत हे आमदारांच्याही लक्षात आले नव्हते.पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि स्वत: फडणवीस या चौघांनाच काय चालले आहे आणि काय करायचे आहे याची कल्पना आहे. दिल्लीतून आलेले आदेश अंमलात आणण्यास महाराष्ट्रातील ज्यांची गरज असते फक्त त्यांनाच बोलावून फडणवीस बंद दरवाजात चर्चा करतात. बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचे मैत्र आहे. या मैत्रीतूनच सत्तेचा सोपान लवकर गाठला जाण्याची चिन्हे आहेत. दोघांमध्ये सातत्याने चर्चाही होत आहे. फडणवीस १६० च्यावर संख्याबळ नेण्याचा फॉर्म्युला तयार करत आहेत.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार, डॉ.संजय कुटे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, अतुल भातखळकर, श्रीकांत भारतीय, रवींद्र चव्हाण या निवडक नेत्यांना एखाद्या मोहिमेची वा चालीची कल्पना स्वतंत्रपणे फडणवीस देतात. सगळ्यांना सगळ्या गुप्त विषयांची कल्पना नसते. फडणवीस यांनी अमित शहा, नड्डा यांच्याशी चर्चा करून सत्तेचे स्क्रिप्ट तयार केले, अशी माहिती मिळते. दोन महिन्यांपासून फडणवीस हे त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देशातील धार्मिक स्थळांचे दर्शन घेत होते. तीनचार ठिकाणी ते जाऊन आले. त्यांच्या राशीत सत्तायोग असल्याचे जवळचे लोक सांगतात. पुन्हा येण्याच्या मार्गावर त्यांची चाणाक्ष नजर लागली आहे.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपामहाराष्ट्र