शेवटच्या क्षणापर्यंत संभ्रम?; महाजनांची वर्षा बंगल्यावर धाव, तर शिवसेनेचे नेते फडणवीसांच्या भेटीला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 14:59 IST2024-12-05T14:59:14+5:302024-12-05T14:59:38+5:30

गृहमंत्रिपद मिळणार असेल तरच मी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारून सरकारमध्ये सहभागी होईल, असा पवित्रा एकनाथ शिंदे यांनी घेतल्याची चर्चा आहे.

Devendra Fadnavis Oath Ceremony Confusion until the last minute in mahayuti bjp girish Mahajan meets eknath shinde | शेवटच्या क्षणापर्यंत संभ्रम?; महाजनांची वर्षा बंगल्यावर धाव, तर शिवसेनेचे नेते फडणवीसांच्या भेटीला 

शेवटच्या क्षणापर्यंत संभ्रम?; महाजनांची वर्षा बंगल्यावर धाव, तर शिवसेनेचे नेते फडणवीसांच्या भेटीला 

Devendra Fadnavis Oath Ceremony ( Marathi News ) :महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला अवघे काही क्षण बाकी असताना खातेवाटपाचा घोळ अजूनही कायम असल्याचं दिसत आहे. कारण गृहमंत्रिपदाची मागणी करणारे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचं समाधान करण्यात भाजपला यश आलेलं नसून त्यांची समजूत काढण्यासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने गिरीश महाजन हे वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. गृहमंत्रिपद मिळणार असेल तरच मी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारून सरकारमध्ये सहभागी होईल, असा पवित्रा शिंदे यांनी घेतल्याची चर्चा आहे. मात्र गृहमंत्रिपद सोडायला भाजपचीही तयारी नसल्याने हा तिढा शपथविधीच्या दिवशीही कायम आहे.

एकीकडे, भाजपकडून गिरीश महाजन एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेले असताना शिंदेंचा निरोप घेऊन शिवसेना नेते उदय सामंत आणि भरत गोगावले हे देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी दाखल झाले आहेत. शिंदे यांनी उदय सामंत आणि भरत गोगावले यांच्याकडे नेमका काय निरोप दिला, याबाबत आता तर्क-वितर्क लढवले जात आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे हे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असा दावा आज सकाळपासून महायुतीच्या विविध नेत्यांकडून केला जात होता. परंतु शपथविधीचा सोहळा दोन तासांवर येऊन ठेपला असतानाही अजूनही खातेवाटपाची खलबतं सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या मागण्या मान्य होणार का आणि ते आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ ग्रहण करतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: Devendra Fadnavis Oath Ceremony Confusion until the last minute in mahayuti bjp girish Mahajan meets eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.