Devendra Fadnavis vs Mahavikas Aaghadi: महाराष्ट्रात पेट्रोलवर केंद्र सरकारचा कर १९ रुपये प्रतिलीटर तर राज्याचा कर २९ रुपये आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोलेंनी सांगावे की राज्यात पेट्रोल-डिझेलची महागाई कोणामुळे आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या नावाने कायम गळा काढणाऱ्या खोटारड्यांना आंदोलनं करून उघडे पाडण्याचे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना केले. महाविकास आघाडी सरकारने ओबीसी राजकीय आरक्षणाची हत्या केली असून ते परत मिळण्यासाठीही लढा चालू ठेवा असेही फडणवीस म्हणाले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यसमिती बैठक मुंबईत प्रदेश कार्यालयात झाली.
"केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कमी केल्यामुळे किमतीत कपात झाली. परिणामी राज्यातील करामुळे मिळणारी रक्कमही आपोआप कमी झाली. तरीही हा दर आपणच कमी केल्याचे महाविकास आघाडीने सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले महागाईवर बोलत असतात, पण आता राज्यात पेट्रोलवर केंद्राच्या करापेक्षा राज्याचा कर दहा रुपये जास्त असताना महागाई कोणामुळे आहे हे या नेत्यांनी सांगितले पाहिजे. राज्यातील पेट्रोल डिझेलची इंधनवाढ केवळ महाविकास आघाडी सरकारमुळे आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी याच्या विरोधात आंदोलने करून आघाडी सरकारचा खोटारडेपणा उघड करावा", असे आदेश फडणवीसांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिले.
"सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर ते परत कसे मिळवायचे याचा उपाय आपण मध्य प्रदेश सरकारला सांगितला. त्यानुसार त्यांनी डेटा गोळा करून कारवाई केली व त्या राज्यात ओबीसींना राजकीय आरक्षण परत मिळाले. आपण हाच उपाय अनेकदा महाविकास आघाडी सरकारला सांगितला पण त्यांनी त्यानुसार कारवाई केली नाही व ओबीसींना राजकीय आरक्षण परत मिळाले नाही. ओबीसींना आरक्षण मिळूच नये यासाठी कोणाचे तरी षडयंत्र दिसते", अशी टीका फडणवीसांनी केली.