Join us

Devendra Fadnavis PC: २ तासांच्या चौकशीत काय घडलं? देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 3:12 PM

सरकारने दडवलेला रिपोर्ट मी बाहेर काढला. त्यात आयपीएस अधिकाऱ्यांपासून सगळ्यांची नावं होतं. त्यामुळे मी ही कागदपत्रे केंद्रीय गृह सचिवांना दिली होती असं फडणवीसांनी सांगितले.

मुंबई – दिलीप वळसे पाटील जे काही म्हणाले त्यात खूप फरक आहे. मला जे प्रश्नं पाठवले आणि आज जे प्रश्न विचारण्यात आले त्यात अंतर होतं. ऑफिशियल सीक्रेट एक्टचा मी उल्लंघन केलं अशाप्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. जेणेकरून मला आरोपी किंवा सहआरोपी बनवण्याचा प्रयत्न चौकशीतून झाला. मी जबाबदार नेत्याप्रमाणे वागलो. पोलीस बदल्यातील घोटाळा बाहेर काढला म्हणून हे सुरू आहे. राज्य सरकारने जो घोटाळा दाबला त्याची कागदपत्रे त्यांनाच देता येत नाही. मी केंद्रीय गृह सचिवांना ही कागदपत्रे सोपावली. अतिसंवेदनशील कागदपत्रे मी कधीच समोर आणली नाही. मंत्री नवाब मलिक यांनी हा प्रकार समोर आणला. मग संवेदनशील कागदपत्रे मलिकांनी उघड केले असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस(BJP Devendra Fadnavis) म्हणाले की, मी सगळी कागदपत्रे प्रसिद्धीच्या झोतात न आणता संबंधित तपास यंत्रणांना दिला आहे. मात्र सरकारचा जो हेतू आहे तो साध्य होऊ शकणार नाही. ३० मे २०२१ ला महाराष्ट्रात झालेल्या बदली घोटाळ्याचे कागदपत्रे केंद्रीय गृह सचिवांना पोहचवलं होतं. कोट्यवधीचा बदली घोटाळा झाला. त्यामुळे ही कागदपत्रे बाहेर कशी गेली त्याबद्दल गुन्हा दाखल झाला होता. त्याबाबत आज चौकशी झाली. मला जी प्रश्नावली पाठवली आणि चौकशीतील प्रश्न मी आरोपी असल्यासारखे प्रश्न विचारले. मी सर्व प्रश्नांची उत्तरं दिले. मी कधीही कागदपत्रे पत्रकार परिषदेत मांडली नाही. सरकारने दडवलेला रिपोर्ट मी बाहेर काढला. त्यात आयपीएस अधिकाऱ्यांपासून सगळ्यांची नावं होतं. त्यामुळे मी ही कागदपत्रे केंद्रीय गृह सचिवांना दिली होती असं त्यांनी सांगितले.

 

तसेच मी विरोधी पक्षनेता असल्याने मला काही विशेष अधिकार आहेत. मी जे काही कागदपत्रे केंद्रीय तपास यंत्रणांना सोपावली ती कागदपत्रे मंत्री नवाब मलिकांनी माध्यमांसमोर आणले आणि पत्रकारांना दिली. मी ज्या प्रकारे सरकारच्या मंत्र्यांचे वाभाडे काढत आहे. विरोधकांना अडकवण्याचा डाव हाणून पाडला. त्यामुळे सरकार जाणीवपूर्वक अशा नोटीस पाठवून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतंय. परंतु मी दबावाला झुकणार नाही. गृहमंत्र्यांनी काहीही सांगितले तरी माझे विशेषाधिकार मला माहिती आहेत. त्यामुळे मी विशेषाधिकार योग्य वेळी वापरेन असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, राज्य सरकारनेच या घोटाळ्याची चौकशी केली असती तर केंद्रीय गृह सचिवांना चौकशी करावी लागली नसती. ६ महिने रिपोर्ट दडवण्यात आला. तो रिपोर्ट मी बाहेर काढला. आता हळूहळू या प्रकरणात अनेक माफीचे साक्षीदार समोर येत आहेत. ज्याचा लोकशाहीवर विश्वास आहे त्यांना अशाप्रकारे विरोधी पक्षनेत्यांना नोटीस देणे चुकीचे आहे हे कळेल. कितीही दबाव बनवला तर एकदिवशी सगळं उघड पडतं. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांनाही चौकशीला सामोरं जावं लागतं. त्यामुळे कायद्यानुसार अधिकारी काम करतील अशी अपेक्षा आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

सगळे पुरावे जमा केलेत, हायकोर्टात जाणार

विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी ज्याप्रकारची विधानं केली. त्यामुळे मला अशाप्रकारची चौकशी होईल, नोटीस येईल हे अपेक्षित होते. मी सगळी तयारी आधीच केली होती. आता हे सगळे पुरावे हायकोर्टात जमा करण्यात येणार आहेत असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

संजय राऊतांना टोला

मला नोटीस आल्यानंतर मी पत्रकार परिषद घेत मी चौकशीला सामोरे जाणार असं थेट सांगितले. संजय राऊतांना अशाप्रकारे नोटीस आली तर पत्रकार परिषद घेत तपास यंत्रणांवर आरोप का करता. तुम्ही चौकशीला सामोरं का जात नाही असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊतांना(Shivsena Sanjay Raut) लगावला.   

टॅग्स :देवेंद्र फडणवीसदिलीप वळसे पाटीलमुंबई पोलीस