Devendra Fadnavis ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीची काही दिवसातच घोषणा होणार असून भाजप, काँग्रेससह सर्व पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून आता दोन दिवसात महाराष्ट्रातील यादी जाहीर करणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर महायुतीमधील इतर पक्षांना म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार याची चर्चा सुरू आहे. जागावाटपासाठी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, महायुतीतील पक्षांना किती जागा देणार यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काल दिवसभरात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत दोन बैठका घेतल्याचे बोलले जात आहे. या बैठकीत लोकसभा जागावाटपाची चर्चा झाली. महायुतीमध्ये राज्यातील काही जांगाचा तिढा अजुनही सुटलेला नाही. काही जागांवरती राष्ट्रवादी आणि शिवसेनेने दावा केल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महायुतीतील पक्षांना सिंगल डिजिट जागा सोडणार असल्याचे बोलले जात आहे, यावरुन आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.
लोकसभेच्या जागावाटपावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही आमच्या मित्र पक्षांना सन्मानाने जागा देऊ. जागावाटपाबाबत सुरू असलेली चर्चा अयोग्य आहे. आमच्या सोबत असलेल्या पक्षांना सन्मानाने जागा देणार आहे, आता सुरू असलेल्या चर्चा या पतंगबाजी आहेत, असेही फडणवीस म्हणाले. भाजपच्या पहिल्या यादीत फक्त भाजप लढणार आहे तिच यादी जाहीर केली आहे. आता आम्ही जिथे आघाडी केली आहे, त्या ठिकाणची यादी योग्यवेळी येईल, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भाजपची यादी ३५ची; शिंदेंच्या शिवसेनेला ९, तर राष्ट्रवादीला ४
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत दोन दिवस केलेल्या चर्चेत भाजपकडून महाराष्ट्रात शिवसेनेला ९ आणि राष्ट्रवादीला ४ जागांची ऑफर दिली असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. भाजपने स्वत:ची ३५ उमेदवारांची यादी तयार केली आहे. मात्र, आपापल्या जागा वाढवून घेण्यासाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार व खा. प्रफुल्ल पटेल यांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. शिंदे यांनी किमान १४ तर राष्ट्रवादीने किमान ११ जागांची मागणी केल्याने जागा वाटपाचा फाॅर्म्युला बुधवारी जाहीर होऊ शकला नाही. आता दिल्लीतच अंतिम निर्णय होईल.
२२ जागा मागणारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि १६ जागांची मागणी करणारी राष्ट्रवादी यांना एवढ्या जागांचा आग्रह शाह यांच्याशी चर्चेत सोडावा लागणार, हे आता स्पष्ट झाले आहे. माझ्यासोबत असलेल्या १३ खासदारांचे मतदारसंघ माझ्या पक्षाकडेच राहिले पाहिजेत, असा आग्रह शिंदे यांनी धरला.