'संजय राऊत कागदावरचे नेते, ऑफिसच्या एसीत बसून मोठे झाले', देवेंद्र फडणवीसांची जोरदार टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 11:27 AM2021-10-04T11:27:51+5:302021-10-04T11:28:31+5:30
Devendra Fadnavis: 'सामना'च्या अग्रलेखावर देवेंद्र फडणवीसांनी दिलं जशास तसं प्रत्युत्तर
Devendra Fadnavis: राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. फडणवीसांच्या या दौऱ्यावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. त्यावर आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत हे कागदावरचे नेते असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. ऑफिसच्या एसीत बसून हे मोठे लीडर झाले आहेत. त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू काय कळणार? अशा शब्दांत फडणवीसांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे.
देवेंद्र फडणवीस आज लातूरच्या दौऱ्यावर आहेत. लातूरातील पूरपरिस्थीतीची ते पाहणी करत आहे. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना फडणवीसांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं. "जे लोक ऑफिसमध्ये बसून टीका करतात. अग्रलेख लिहून नेते होतात. त्यांना शेतकऱ्यांचं दु:ख काय माहित? हे ऑफिसमधले लीडर आहेत. हे कागदावरचे लीडर आहेत. त्यांना काय उत्तर द्यायचं", असं फडणवीस म्हणाले.
सरकारला झोपू देणार नाही
राज्यात अतिवृष्टी झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शेताच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करत आहेत. लातूरातील एका शेतकरी बांधावर जाऊन फडणवीसांनी नुकसानाची पाहणी केली. यावेळी नदीकाठी फडणवीसांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संबोधित केलं. "शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान मी पाहातोय. यावेळीचं संकट खूप मोठं आहे. पण तुम्ही खचून जाऊ नका. जोवर हे सरकार तुम्हाला सरसकट मदत देत नाही तोवर या सरकारला मी झोपू देणार नाही. शेतकऱ्यांना सरसकट मदत झालीच पाहिजे अशी भूमिका मी याआधीच मांडली आहे आणि सरकारला कालच अल्टीमेटम दिला आहे", असं फडणवीस म्हणाले.