मुंबई - भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या काँग्रेसच्या प्रवेशाच्या चर्चेवर आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. मी आमदार झाल्यावर माझ्या मुलाखतीत म्हटलं होतं की, राजकारणात ज्या विचारधारेला डोळ्यासमोर मी पुढे आली. त्या विचारधारेशी मला कधी प्रतारणा करावी लागेल किंवा चुकीच्या तडजोडी कराव्या लागतील तेव्हा मी राजकारणातून एक्झिट घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. आत्ताच्या परिस्थितीत मला एका ब्रेकची आवश्यकता आहे. तो मी घेणार आहे, असे पंकजा मुंडेंनी म्हटलं. पंकजा मुंडेंच्या या भूमिकेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, त्यांनीही पंकजा मुंडे भाजपामध्येच असल्याचं म्हटलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार यांच्या नेतृत्त्वात भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथही घेतली. त्यामुळे, भाजपमध्ये काहीशी नाराजी असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कारण, भाजपचे अनेक नेते थेट राष्ट्रवादीच्या विरोधात मैदानात उतरल्याचं यापूर्वी दिसून आलं आहे. त्यातच, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही त्यांचे भाऊ धनंजय मुंडेंच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. मात्र, आता तेच धनंजय मुंडे सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यामुळे, पंकजा याही नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यावर, देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे या आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव असल्याचे सांगत त्या सातत्याने पक्षाचे काम करत राहतील, असेही ते म्हणाले.
आमच्या पक्षातील काहींचा संघर्ष कायमच राष्ट्रवादीविरोधात राहिला आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी आमच्यासोबत आल्यानंतर काही जणांची नाराजी स्वाभाविक आहे. मात्र, यावर आम्ही संबंधित नेत्यांशी चर्चा करणार आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. पंकजा मुंडे या आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घेऊ. त्यासाठी, आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते पंकजा मुंडेंसोबत चर्चा करतील. त्या पक्षात सातत्याने काम करत राहतील. त्या भाजपमध्येच आहेत, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडेंच्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिलंय.
२ महिने सुट्टीवर जाणार
मी २० वर्षात कधीही सुट्टी घेतली नाही. मला आता त्याची गरज आहे. मला अंर्तमुख होण्याची गरज आहे. त्यामुळे, मी राजकारणापासून २ महिने सुट्टी घेऊन अंर्तमुख होऊन सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहे असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.
म्हणून मला दु:ख झालं
पंकजा मुंडे म्हणाल्या की, राजकारणात सध्या वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळतायेत. बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. शरद पवारांची राष्ट्रवादी राहिली नाही. मात्र, पंडित दिनदयाळ उपाध्याय आणि अटलबिहारी वाजपेयींची भाजपा सदैव राहावी यासाठी माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता धडपडतेय. मी नक्षलग्रस्त भागात जाऊन, अन्नपाण्याची अपेक्षा न करता पक्षासाठी काम करतेय. असं असताना माझ्या नैतिकतेवर आणि विश्वासर्हतेवर शंका निर्माण होणे याने मला दु:ख वाटते असं पंकजा यांनी म्हटलं आहे.