मुंबई - उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार असून, शरद पवार स्वतः उत्तर प्रदेश दौऱ्यावर जाणार आहे. मणिपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पाच जागांवर निवडणुका लढवणार आहे. तर, गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयत्न सुरू असल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले. शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपा नेते आणि गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी, आता गोव्यात जनमताची चोरी होऊ देणार नसल्याचं प्रत्युत्तर पवारांना दिलं आहे.
गोव्यात महाविकास आघाडीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. यासाठी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसशी चर्चा सुरू आहे. गोव्यातील भाजप सरकार हटवण्याची गरज आहे, असे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पाच पैकी तीन राज्यात विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. पवारांच्या या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाशी बोलताना गोव्यासंदर्भात विधान केले.
विरोधी पक्षाचं अस्तित्वच दिसत नाही, त्यामुळे भाजपच्या जागा कमी होतील हाच त्यांचा आनंद आहे. गोव्यात महाविकास आघाडीचा जरूर प्रयोग करावा, पण गोव्यात आम्ही त्यांना संधीच देणार नाहीत. स्पष्ट बहुमत गोव्यातील जनता भाजपला देईल. महाराष्ट्रात तीन पक्षांनी जनमताची चोरी झाली, ती चोरी गोव्यात आम्ही होऊ देणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
2 दिवसांत अंतिम निर्णय होईल
गोव्यात मंत्री आणि आमदारांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, मागील निवडणुकीत काँग्रेसला जनतेला पाठिंबा मिळाला होता. मात्र, भाजपने सत्ता स्थापन केली. आता भाजपमध्ये जे आमदार, मंत्री आहेत, ते काँग्रेसमधून आले आहेत. गोव्यात काही ठिकाणी आम्हाला निवडणूक लढवायची होती त्याची यादी आम्ही इतर दोन्ही पक्षांना दिलीय. पुढील २ दिवसात त्यावर अंतिम निर्णय होईल, असे शरद पवार यांनी सांगितले.