मुंबई - सत्ता गेल्याने काही जण अस्वस्थ आहेत असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. आता, देवेंद्र फडणवी यांनीही शरद पवारांना तितकेच जोरदार आणि खोचक उत्तर दिले आहे. सरकारं पाडणं, काँग्रेसबाहेर पडणं, पुन्हा काँग्रेसमध्ये जाणं, हे सर्व अस्वस्थतेशिवाय थोडंच होतं, त्यामुळे पवारांनी अस्वस्थतेवर बोलू नये, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला.
देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तेव्हा शरद पवारांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, जेव्हा गोष्टी जुन्या होतात, तेव्हा लोक विसरतात आणि सोईच्या गोष्टी लक्षात ठेवतात. कोणी सरकार पाडलं, मग पुन्हा काँग्रेसमध्ये कोण गेलं. मग पुन्हा काँग्रेसचं सरकार कुणी पाडलं, याचा इतिहास सर्वांना माहिती आहे. अशा प्रकारे सरकारं पाडणं, काँग्रेसबाहेर पडणं, पुन्हा काँग्रेसमध्ये जाणं, हे सर्व अस्वस्थतेशिवाय थोडंच होतं. कुणी स्वस्थ बसलाय आणि मॅच बघतो, तो थोडंस असं करेल. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. मी एकाच पक्षात आहे. माझा पक्ष सत्तेत येणारच आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
दरम्यान, शरद पवार देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, सरकार गेल्यानं काही जण अस्वस्थ आहेत. सत्ता गेल्यानं वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण सत्ता येत जात असते. सत्ता गेल्यानं इतकं अस्वस्थ होण्याचं कारण नाही. सत्ता गेल्यानं अस्वस्थ होण्याचं कारण नाही. मी अनेकदा सत्ता गमावली आहे. मात्र त्यामुळे कधीही अस्वस्थ झालो नाही, असं पवार म्हणाले. यावेळी त्यांनी १९८० मध्ये पुलोद सरकार बरखास्त झाल्याची आठवण झाली. १९७८ मध्ये राज्यात पुलोदचं सरकार होतं. १९८० मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या शिफारशीनंतर पुलोद सरकार बरखास्त करण्यात आलं. मात्र मी अस्वस्थ झालो नाही, अशी आठवण पवारांनी सांगितली.
सरकार बरखास्त करण्यात आल्याची माहिती मला मुख्य सचिवांकडून समजली. त्यानंतर मी माझ्या काही मित्रांना निवासस्थानी बोलवून घेतलं. सामानाची आवराआवर, बांधाबांध केली आणि दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो. तेव्हा वानखेडेवर भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना सुरू होता. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान सोडल्यावर मी कसोटी सामना पाहायला मैदानावर गेलो होतो, असं पवारांनी सांगितलं होतं.