Join us

डुकराशी कुस्ती करू नये; देवेंद्र फडणवीसांचा नाव न घेता नवाब मलिकांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 11:58 AM

मलिक यांनी केलेल्या आरोपाला आणि फोडलेल्या हायड्रोजन बॉम्बला फडणवीसांनी एका ट्विटने उत्तर दिलंय. त्यामध्ये, डुकराचा उल्लेख केला असून डुकराशी कुस्ती खेळू नये, असेही त्यांनी म्हटलंय.

ठळक मुद्दे १४ कोटी ५६ लाखांच्या बनावट नोटा सापडल्या. मात्र हे प्रकरण दाबून टाकण्यास देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली. बनावट नोटांचा धंदा देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणाखाली चालत होता, असा दावा मलिक यांनी केला.

मुंबई - भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप कागदपत्रे दाखवून केला होता. त्यानंतर नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधांचा हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला. दरम्यान, मलिक यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांच्यावर अनेक आरोप केले. त्यामध्ये, नोटीबंदीच्या काळात साडे १४ कोटींच्या बनावट नोटा सापडल्याचे प्रकरण फडणवीस यांनी दाबल्याचा आरोप मलिक यांनी केला. आता, फडणवीस यांनी मलिकांच्या आरोपाला एका वाक्यात उत्तर दिलंय. 

मलिक यांनी केलेल्या आरोपाला आणि फोडलेल्या हायड्रोजन बॉम्बला फडणवीसांनी एका ट्विटने उत्तर दिलंय. त्यामध्ये, डुकराचा उल्लेख केला असून डुकराशी कुस्ती खेळू नये, असेही त्यांनी म्हटलंय.  खूप पूर्वीच एक गोष्ट शिकलोय, डुकराशी कधीही कुस्ती करू नका. कारण, तुम्ही गलिच्छ व्हाल आणि डुकराला तेच आवडेल, अशा आशयाचे ट्विट फडणवीस यांनी केले आहे. फडणवीस यांनी कुणाचेही नाव घेतले नाही, पण नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीसांनी हे ट्विट केलंय. त्यामुळे, त्यांच्या या ट्विटचा टोला स्पष्टपणे नवाब मलिक यांच्याकडेच इशारा करत असल्याचे दिसून येते. 

मलिकांनी फडणवीसांवर काय केले आरोप

फडणवीसांबाबत हायड्रोजन बॉम्ब फोडणार म्हणत, नवाब मलिक म्हणाले की, ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर केली होती. नोटाबंदीमुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडेल. काळा पैसा, बनावट नोटा संपुष्टात येतील असा दावा करण्यात येत होता. नोटाबंदी झाल्यानंतर देशातील विविध भागात बनावट नोटा सापडल्या. मात्र, महाराष्ट्रात ८ ऑक्टोबर २०१७ पर्यंत बनावट नोटांचे एकही प्रकरण समोर आली नव्हेत. ८ ऑक्टोबर २०१७ रोजी मुंबईतील बीकेसीमध्ये छापेमारी झाली. त्यात १४ कोटी ५६ लाखांच्या बनावट नोटा सापडल्या. मात्र हे प्रकरण दाबून टाकण्यास देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली. बनावट नोटांचा धंदा देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणाखाली चालत होता, असा दावा मलिक यांनी केला.

दरम्यान, बनावट नोटाप्रकरणाता मुंबईतून एका व्यक्तीला अटक झाली. तर पुण्यातही एकाला अटक करण्यात आली. इम्रान आलम शेख असे यामध्ये अटक झालेल्या एका व्यक्तीचे नाव होते. याप्रकरणी नवी मुंबईतही अटकेची कारवाई झाली. पण १४ कोटी ५६ लाख किमतीच्या बनावट नोटांचे हे प्रकरण ८ लाख ८० हजार रुपयांच्या बानावट असल्याचे दाखवून दाबले, असा आरोप मलिक यांनी केला. हे बनावट नोटांचे प्रकरण एनआयएकडे का सोपवले गेले नाही, असा सवालही मलिक यांनी उपस्थित केला.  

टॅग्स :नवाब मलिकदेवेंद्र फडणवीसअमली पदार्थगुन्हेगारी जगत