मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील विकासकामांच्या भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी महाराष्ट्रात येत असतात. यापूर्वीचा पालखी मार्गासाठीचा दौरा असेल, समृद्धी महामार्गासाठीचा दौरा असेल मोदींनीच या विकासकामांचे लोकार्पण केले. केंद्र आणि राज्य मिळून असलेलं डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी सदैव आपल्या पाठिशी असल्याचा विश्वास मोदी आपल्या भाषणातून देतात. आता पुन्हा एकदा मुंबईतील ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ करण्यासाठी मोदी मुंबईत येत आहेत. गुरुवार १९ जानेवारी रोजी मुंबईतील बीकेसी मैदान येथे मोदींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील बीकेसी मैदानात जाऊन सुरक्षा यंत्रणा आणि तयारीची पाहणी केली. यावेळी, भाजपचे सहकारी नेते आणि पोलीस अधिकारीही उपस्थित होते. मोदी मुंबईतील २ नव्या मेट्रो २ लाईन्सचे उद्घाटन करणार आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही मेट्रो लाईन्सचे भूमीपूजनही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हस्ते २०१५ साली झाले होते. आता, त्यांच्याच हस्ते या मेट्रो लाईन्सचे लोकार्पण होत आहे. आपला दवाखाना, सीएसएमटी रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास, स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी सीवेज शोध सयंत्रांचे भूमीपूजन, मुंबई १ मोबाईल अॅपचे लाँचिंग इत्यादी कामांचेही भूमीपूजन आणि लोकार्पण मोदींच्या हस्ते होत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मोदींच्या दौऱ्यासंदर्भात बीकेसी मैदानावर जाऊन पाहणी केली. यावेळी, पंतप्रधानांसाठीच्या सुरक्षा यंत्रणेचा आणि ट्रॅफिक मार्गाचाही आढावा फडणवीसांनी घेतला. त्यासोबतच, कार्यक्रमस्थळी असलेली यंत्रणाही पाहिली. यावेळी फडणवीसांनी बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरण सोहळ्यातील निमंत्रण पत्रिकेवरुन असलेल्या वादावर आपणास माहिती नसल्याचे म्हटले.