मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या विधानावरुन सध्या युद्ध रंगले आहे. अमृता फडणवीस यांनी फक्त 'ठाकरे' आडनाव असून सुद्धा कोणी ठाकरे होऊ शकत नसल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर शिवसेनेकडूही अमृता फडणवीस यांच्या टीकेवर शिवसेनेकडून देखील जसेच तसे प्रत्युत्तर देण्यात आले होते. अमृता फडणवीस आणि शिवसेनेत ट्विटरवॉर सुरु असताना आता मुख्यमंत्र्यांच निवसस्थान असलेल्या वर्षा बंगल्यामधील भितींचीही भर पडली आहे. वर्षा बंगाल्यामधील भिंतीवर उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह मजकूर आढळल्याने राजकारण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वर्षा बंगलाच्या भिंतींवर देवेंद्र फडणवीस रॉक्स असं लिहण्यात आलं आहे. तसेच हू इज यू टी म्हणजे यु टी कोण आहेत...? यू टी इज मीन म्हणजे यू टी वाईट आहेत. 'यूटी' म्हणजे नेमकं कोण?; यावरून आता तर्कवितर्क लावले जात असले तरी उद्धव ठाकरे यांच्या नावाचं इंग्रजीतील संक्षिप्त रूप 'यूटी' असं होतं. त्यामुळं हे त्यांनाच उद्देशून असल्याची चर्चा आहे. मात्र, ते नेमकं कोणी लिहिलं आहे, व्हिडिओ कोणी चित्रण केला आहे, याबाबत मात्र कोणतीही सध्या माहिती समोर आलेली नाही.
देवेंद्र फडणवीस यांची मुलगी दिविजानं लिहिलं असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी बंगला सोडण्यापूर्वी आम्ही एक एक कोपरा चेक केला होता. तेव्हा असं काहीही लिहिलेलं आढळलं नव्हतं. तसेच दिविजानं तर असं काही लिहिण्याचा प्रश्नच नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच आमची बदनामी करण्यासाठी अतिशय खालच्या स्तरावरील राजकारण करत असल्याचा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.