Join us

Devendra Fadnavis: दाऊदसोबत व्यवहार करणाऱ्या मंत्र्याला वाचवण्यासाठी कुणाचा दबाव?, फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 12:21 PM

एखादा मंत्री तुरुंगात असूनही त्याचा राजीनामा घेतलेला नाही हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं आहे.

मुंबई-

एखादा मंत्री तुरुंगात असूनही त्याचा राजीनामा घेतलेला नाही हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं आहे. मुंबईतील बॉम्बस्फोटाच्या आरोपींसोबत व्यवहार केल्याचं नवाब मलिकांच्या रिमांडमध्ये स्पष्ट नमूद असतानाही त्यांचा त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही, हे सरकार दाऊद शरण सरकार आहे, असा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते विधनभवनाच्या बाहेर प्रसार माध्यमांशी बोलत होते. 

"जी शिवसेना दाऊदचं नाव आलं तरी आक्रमक होत होती आज त्याच शिवसेनेचे मुख्यमंत्री दाऊदसोबत व्यवहार केलेल्या व्यक्तीला पाठिशी घालत आहे. दाऊद सोबतच्या व्यवहारात हात असलेल्या मंत्र्याला पाठिशी घालण्यासाठी ठाकरे सरकारवर नेमका कुणाचा दबाव आहे हे मुख्यमंत्र्यांना सांगावच लागेल. नवाब मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय भाजपा शांत बसणार नाही", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

संजय राठोडांचा राजीनामा घेतला मग मलिकांचा का नाही?शिवसेनेचे मंत्री संजय राठोड तर तुरुंगातही गेले नव्हते. पण नैतिकतेच्या आधारावर त्यांचा राजीनामा घेण्यात आला होता. इथंतर नवाब मलिक तुरुंगात आहेत आणि त्यांच्यावरील आरोप तर अत्यंत गंभीर आहेत. तरीही त्यांचा राजीनामा न घेण्यामागचं नेमकं कारण काय? सरकारवर नेमका कुणाचा दबाव आहे?, असं फडणवीस म्हणाले. विधानसभेत आम्ही सरकारला जाब विचारतच राहणार. सरकार आमच्या प्रश्नांपासून पळ काढत आहे पण आम्ही मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असंही फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसनवाब मलिकराष्ट्रवादी काँग्रेसभाजपाउद्धव ठाकरे