मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील वादाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. केंद्र सरकारचं पॅकेज आणि राज्य सरकारला केंद्राकडून देण्यात येणाऱ्या पैशांबाबतही फडणवीस यांनी आकडेमोड केली आहे. त्यानंतर, आता महाविकास आघाडीचे नेते फडणवीस यांना प्रश्न विचारत आहेत. परिवहनमंत्री अनिल परब यांच्यानंतर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीसांना आकडेवारी जाहीर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, जनतेची दिशाभूल करू नये, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.
ठाकरे सरकारवर होणाऱ्या हल्ल्यांना खासदार संजय राऊत एकटे तोंड देत असताना परब यांनी पहिल्यांदाच विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडून आलेली मदत आणि राज्य सरकारला दिलेले सल्ले यावरून परब यांनी हल्लाबोल केला आहे. राज्यात फक्त तुम्हालाच अर्थगणित कळत नाही, असं म्हणत परब फडणवीसांवर बसरले. तर, पृथ्वीराज चव्हाण यांनीही केंद्र सरकारचे “कर्जाधारित” पॅकेज म्हणजे जणू काही राज्याच्या तिजोरीत रक्कम हस्तांतरित झाली आहे, असे भासवून जनतेची दिशाभूल करू नये, असा टोलाच लगावला.
''राज्याच्या विरोधीपक्ष नेत्यांनी केंद्राच्या वतीने कर्ज किती व रोख खर्च किती याची स्वतंत्र आकडेवारी द्यावी. केंद्र सरकारने अनेक अटी व शर्तींसह जाहीर केलेले “कर्जाधारित” पॅकेज म्हणजे जणू काही राज्याच्या तिजोरीत रक्कम हस्तांतरित झाली आहे, असे भासवून जनतेची दिशाभूल करू नये.'', असे ट्विट पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. त्यासोबत, एक पत्रही चव्हाण यांनी शेअर केलं आहे. त्यामध्ये, महाराष्ट्राच्या वाट्याला जास्तीत जास्त २० हजार कोटी रुपये येऊ शकतात, असं गणितच चव्हाण यांनी मांडलं आहे.
गंजलेल्या तोफांमधून हल्ले कसे होणार?; संजय राऊत यांची टीका
माणूसकीच्या नात्याने विदेशात अडकलेले २५९४ महाराष्ट्रीयन राज्यात परतले