Join us  

Eknath Shinde: फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर प्रेम, दया, 'करुणा' दाखवली, शिंदेंची तुफान फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 3:26 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आणि महाविकास आघाडीमध्ये होणारी घुसमट यामुळे बंडखोरी केली

मुंबई - विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुगलबंदी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळत आहेत. शिंदे गटाच्या आमदारांना भाजपाकडून प्रत्येकी ५० कोटी रूपये देण्यात आल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. त्यातच आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर उभे राहून घोषणाबाजी केली. "खाऊन खाऊन पन्नास खोके, माजलेत बोके माजलेत बोके..." अशा घोषणा देत विरोधकांनी शिंदे गटाला टोला लगावला. त्यानंतर, सभागृहातही फटकेबाजी केली. धनंजय मुंडेंनीएकनाथ शिंदेना ऐकनाथ होऊ नका, असा टोला लगावला. मुंडेंच्या या टिकेला शिंदेनी जशास तसं उत्तर दिलं आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आणि महाविकास आघाडीमध्ये होणारी घुसमट यामुळे बंडखोरी केली. सुरूवातील १२-१५ आमदारांना घेऊन ते सूरतला गेले. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी कारभार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अखेरीस शिवसेनेचे सुमारे ५० आमदार आणि काही अपक्ष आमदार यांच्या साथीने शिंदे गटाने भाजपासोबत महाराष्ट्रात सत्तास्थापना केली. त्यामुळे, विरोधकांकडून सातत्याने शिंदे गटाच्या आमदारांना गद्दार म्हटले जाते. चलो गुवाहटी, चलो गुवाहटी म्हटले जाते, ५० कोटी रुपये घेतल्यावरुनही डिवचले जाते. त्याला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहात उत्तर दिलं आहे. 

बाहेर ओरडणाऱ्याकडे फक्त दोनच शब्द आहे, या दोन शब्दांशिवाय यांच्याकडे दुसरं काय आहे. धनंजय मुडें परवा मोठ-मोठ्याने ओरडत होते, चलो गुवाहटी... चलो गुवाहटी... असे म्हणत होते. अगदी बेंबीच्या देटापासून ते ओरडत होते. जणू काय ते खूप वर्षांपासूनचे शिवसैनिक आहेत. आता, यांच्याबद्दल काय बोलावं, तुमचा सगळा प्रवास मला माहितीय, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धनंजय मुंडेंवर टिका केली. तसेच, आम्हाला सगळं माहितीय, देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यावर तेव्हा प्रेम, दया, करुणा दाखवली. पण, परत परत ती दाखवता येणार नाही, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी विधानसभा सभागृहात तुफान फटकेबाजी केली. त्यावेळी, सभागृहात चांगलाच हशा पिकला. तसेच, जनतेतून सरपंच निवडीची मागणी ही सरपंच परिषदेची होती, असेही त्यांनी सांगितले.   

सभागृहाच्या पायऱ्यावर विरोधकांचा हल्लाबोल

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर हे पावसाळी अधिवेशन तुफान वादळी होणार याची साऱ्यांनाच कल्पना होती. त्या अनुषंगाने अधिवेशनाचे पहिले दोन दिवस तुलनेने शांततेत गेले. पण आज मात्र महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. "खाऊन खाऊन पन्नास खोके, माजलेत बोके माजलेत बोके...", अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी शिंदे गटाचा समाचार घेतला. तसेच, "पन्नास खोके, एकदम ओके... गद्दारांचं सरकार हाय हाय!!!... आले रे आले गद्दार आले...", अशादेखील घोषणा देत टीका केली. तशातच, "ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी... स्थगिती सरकार हाय हाय...", अशा घोषणा देत भाजपालाही टोला लगावला. 

टॅग्स :धनंजय मुंडेएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसविधानसभा