मुंबई - महाराष्ट्रातील वाढती कोरोना रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनला असून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. राज्यातील कोरोना संसर्गाचा दर 23 ते 24 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कोरोना टेस्टींग रिपोर्ट शेअर केले आहेत. त्यामध्ये 1 जुलै ते 21 जुलै दरम्यानच्या सरासरीवरुन कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याचं त्यांनी दाखवून दिलंय.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिल्ली, मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोना चाचणी अहवालांच्या प्रति शेअर केल्या आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीतील कोरोना चाचण्यांचा तुलनात्मक लेखाजोखाही फडणवीस यांनी मांडला आहे. मुंबईत संसर्गाचा दर 21 ते 27 टक्क्यांवर स्थिरावलेला आहे. त्यातच, चाचण्यांची संख्या अतिशय कमी. 1 ते 19 जुलैच्या दरम्यानची सरासरी काढली तरी केवळ 5500 चाचण्या दररोज होत आहेत. महाराष्ट्र आणि मुंबईतील कोरोनाबळींची संख्या दररोज सरासरी तेवढीच असल्याचा निष्कर्ष फडणवीस यांनी मांडला आहे. त्या तुलनेत दिल्लीत कोरोना आटोक्यात येत असल्याचंही ते म्हणाले.
नवी दिल्लीत केंद्रीयमंत्री अमित शाह यांनी हस्तक्षेप केल्यानंतर आणि चाचण्यांची संख्या वाढविल्यानंतर परिस्थिती बदलल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. संसर्गाचा दर 30 ते 35 टक्क्यांहून आता 6 टक्क्यांवर आलेला आणि कोरोना बळींच्या संख्येतही घसरण झाली आहे. तरीही, चाचण्यांची संख्या दररोज कायम असल्याचं सांगत, दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यात यश आल्याचं फडवणवीस यांनी म्हटलंय. त्यासाठी, दिल्लीतील कोरोना चाचण्यांचा अहवालही त्यांनी शेअर केला आहे.
दरम्यान, आता तरी जागे व्हा, मोठ्या प्रमाणात चाचण्यांना पर्याय नाहीच, असेही फडणवीस यांनी म्हटलंय. Red exclamation mark symbol कोरोनावर मात करण्याचा, रूग्णसंख्या कमी करण्याचा आणि राज्यातील नागरिकांचे मृत्यू रोखण्याचा एकमात्र उपाय म्हणजे अधिकाधिक चाचण्या, संशयितांचे विलगीकरण आणि इतरांची सुरक्षा हेच आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.