बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उदघाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको?, फडणवीसांचा जोरदार हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 02:56 PM2021-06-22T14:56:06+5:302021-06-22T15:04:14+5:30
'बारमध्ये गर्दी झालेली चालते, पक्ष कार्यालयाच्या उदघाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको?', असा रोखठोक सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
राज्य सरकारच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशन घेण्याच्या निर्णयाचा निषेध करत राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर विविध मुद्द्यांवरुन जोरदार हल्लाबोल केला आहे. 'बारमध्ये गर्दी झालेली चालते, पक्ष कार्यालयाच्या उदघाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको?', असा रोखठोक सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
राज्याच्या अधिवेशनाचे दिवस जवळ आले की राज्यात कोरोना वाढतो असं आमच्या लक्षात आलं आहे. राज्यासमोर इतके गंभीर प्रश्न निर्माण झालेले असताना हे सरकार फक्त दोन दिवसांचं अधिवेशन जाहीर करुन राज्यातील जनतेचा अपमान करतंय. लोकशाही बासनात गुंडाळायची कार्यपद्धती या सरकारनं सुरू केली आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवरुन साधला निशाणा
राज्यातील प्रश्न तर सोडाच पण विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम देखील हे सरकार अद्याप मार्गी लावू शकलेलं नाही. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीवर काहीच ठाम भूमिका घेतलेली नाही. राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठीचं पत्र केव्हाच सरकारला दिलं आहे. पण राज्य घटनेचे सर्व नियम पायदळी तुडवून राज्याचे मंत्री मस्तवाल झालेत, हे प्रशासन अर्निंबध झालंय, मग यांना आम्ही प्रश्न विचारायचे नाहीत का?, असं संताप फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.