Devendra Fadnavis: कोरोना लशींबाबत माध्यमांशी बोलण्यापेक्षा केंद्राशी बोलावं; फडणवीसांचा राजेश टोपेंना खोचक सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 03:16 PM2021-04-07T15:16:44+5:302021-04-07T15:18:30+5:30
Devendra Fadnavis On Rajesh Tope: राजेश टोपेंच्या विधानावर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला टोला लगावला आहे.
Devendra Fadnavis On Rajesh Tope: राज्यात केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोरोना लशींचा साठा असल्याची माहिती आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी टोपे यांनी केंद्राकडून लशींचा पुरवठा होत असला तरी त्यात वेग नसल्याचं म्हटलं. टोपेंच्या विधानावर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला टोला लगावला आहे. "राज्यातील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलण्यापेक्षा केंद्र सरकारशी संवाद साधावा. देशात सर्वाधिक लशीचा पुरवठा महाराष्ट्रालाच केला जात आहे", असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
लस नाही म्हणून लसीकरण केंद्र बंद करावी लागतायत; राजेश टोपे केंद्र सरकारवर संतापले
"राज्य सरकारमधील मंत्री आणि नेते कोरोना लसीकरणासंदर्भात करत असलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. राज्याच्या लसीकरण क्षमतेनुसारच टार्गेट ग्रूपला आवश्यक इतक्या लशींचा पुरवठा केंद्राकडून केला जात आहे. केंद्र सरकारकडून सर्वाधिक लसी महाराष्ट्रालाच दिल्या जात आहेत. भारत सरकार काही वेगळं आहे का? त्यामुळे राज्य सरकारमधील मंत्र्यांनी या गोष्टी माध्यमांशी बोलण्यापेक्षा केंद्राशी चर्चा करावी. माध्यमांमध्ये बोलायचं आणि हात झटकायचं हे आधी बंद झालं पाहिजे", असा घणाघात फडणवीस यांनी केला आहे.
मुस्लीम समाजात लसीकरणाचा वेग अत्यंत कमी, राजेश टोपेंनी केलं महत्वाचं आवाहन
लॉकडाऊन विरोधात उद्रेक होईल
राज्यात सातही दिवस १०० टक्के लॉकडाऊन असल्याचं चित्र आहे. विकेंडला दोन दिवस लॉकडाऊन आणि पाच दिवस कडक निर्बंध असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात सर्वच बंद करुन ठेवलं आहे. यामुळे राज्यातील लहान उद्योजक, छोटे व्यापारी आणि नागरिकांचा उद्रेक होईल याची काळजी सरकारनं घ्यावी, असा सल्ला फडणवीस यांनी दिला आहे.
रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबवा
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याच्या मुद्द्यावरही फडणवीस यांनी सरकारवर ताशेरे ओढले. रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. त्यामुळेच तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडेसिवीर हे कोरोना काळातलं अत्यंत महत्वाचं औषध असताना राज्य सरकारनं याबाबत तात्काळ कारवाई करायला हवी, काळाबाजार रोखला गेला पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.