मुंबई: देवेंद्र फडणवीस हे अत्यंत हुशार आणि अभ्यासू मुख्यमंत्री आहेतच, पण त्याचबरोबर ते चतुर राजकारणीही आहेत, हे मंगळवारी पुन्हा सिद्ध झालं. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८'च्या रंगमंचावर झालेल्या 'न भूतो' मुलाखतीत युतीचा विश्वास व्यक्त करताना त्यांनी 'मित्रपक्ष' शिवसेनेवर ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे नावाचं सर्वशक्तिमान ब्रह्मास्त्र सोडलं, त्या खेळीला तोड नव्हती. आपल्या 'बाऊन्सर'वर मुख्यमंत्र्यांनी मारलेला हा सिक्सर पाहून मुरब्बी शिवसेना नेते संजय राऊतही क्षणभर अचंबित झाले.
शिवसेना हा पक्ष आजही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालतो. त्यामुळे तथाकथित सेक्युलर पक्षांचा पाडाव करण्यासाठी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपा-शिवसेना एकत्र येणारच, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. तो त्यांचा मास्टरस्ट्रोकच म्हटला पाहिजे. कारण, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे तमाम शिवसैनिकांचं दैवत आहेत. त्यांच्या हिंदुत्वाच्या विचारासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल, ही मुख्यमंत्र्यांची साद नक्कीच भावनिक ठरणारी आहे. बाळासाहेब असते तर त्यांच्या हातात सरकारचा रिमोट द्यायला आवडला असतं, असं प्रांजळपणे सांगून फडणवीस यांनी सैनिकांची मनं जिंकून घेतली आहेत. इतकंच नव्हे तर, २०१४ मध्ये युती झाली असती तर उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री असते, असं सूचित करत त्यांनी शिवसेनेच्या आशा पल्लवित केल्यात.
२०१९ मधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, शिवसेनेसोबतच्या तुटलेल्या गाठी पुन्हा बांधण्याचा, दुरावा दूर करण्याचा प्रयत्न भाजपाने सुरू केल्याचं चित्र आहे. त्यामागे राजकीय गरज, राजकीय अपरिहार्यता हा भाग आहेच. एनडीएतील अनेक मित्र नाराज असल्यानं, थोडं नमतं घेत ते जुन्या मित्रांना गोंजारण्याचा प्रयत्न करताहेत. पण, भाजपाची चाल ओळखू लागलेल्या शिवसेनेचा स्वबळाचा इरादा पक्का आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्धारावर ठाम दिसताहेत. उलट, तिसऱ्या आघाडीतील काही जणांशी जवळीक करून ते भाजपाला डिवचताहेत. कर्नाटकातही त्यांनी भाजपाची डोकेदुखी वाढवलीय. त्यामुळेच, 'लोकमत'च्या व्यासपीठावर संजय राऊत मुख्यमंत्र्यांना युतीबाबत काय विचारतात आणि फडणवीस हा 'गुगली' कसा टोलवतात, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. पण, तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी सुपरिचित असलेल्या मुख्यमंत्र्यांनी अगदी सरळ बॅटने हा चेंडू सीमेपार धाडला.
बाळासाहेबांबद्दल आमच्या मनात आदर आहे, इतकंच विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केलं होतं. शिवसेनेनं संपूर्ण प्रचारात भाजपावर हल्ला चढवला होता. याउलट, बाळासाहेबांच्या शिवसेनेवर टीका न करण्याचं धोरण भाजपाने अमलात आणलं होतं. त्याचा काय परिणाम झाला, ते आपण सगळ्यांनीच पाहिलंय. त्यामुळेच आता पुन्हा भाजपाने बाळासाहेब हे ब्रह्मास्त्र भात्यातून बाहेर काढल्याचं दिसतंय.
भाजपा-शिवसेना युती पुन्हा होईल का, हे आत्ताच सांगणं कठीण आहे. पण, बाळासाहेबांचं नाव आल्याने भाजपाच्या प्रस्तावाकडे शिवसेनेला अगदीच दुर्लक्ष करता येणार नाही, हे मात्र नक्की. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली, असं म्हणायला हरकत नाही.