मुंबई - अंधेरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील सत्ताधारी शिंदे गट-भाजपा आणि उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष आमने सामने आले आहेत. दरम्यान, या पोटनिवडणुकीबाबत सहानुभूतीने विचार करून भाजपाने उमेदवार मागे घ्यावा तसेच ऋतुजा लटके यांच्या बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन करणारं पत्र मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले होते. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज ठाकरेंच्या पत्रावर चर्चेशिवाय निर्णय घेता येणार नाही. भाजपा नेत्यांशी आणि शिंदेंशी चर्चा करूनच आपण निर्णय घेऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी अंधेरी पोटनिवडणुकीबाबच पाठवलेल्या पत्राबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपामध्ये मी काही एकटा निर्णय करू शकत नाही. त्यामुळ राज ठाकरे यांच्या पत्रावर विचारही करायचा असेल तर मला माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल. तसेच पक्षातही वरिष्ठ पातळीवर चर्चा करावी लागेल. कारण आम्ही उमेदवार घोषित केला आहे आणि दिलाही आहे. त्यामुळे आता या पातळीवर आता यासंदर्भात काही भूमिका असेल तर ती मला घेता येणार नाही. त्यामुळे आमच्या पक्षात चर्चा करावी लागेल. तसेच आमच्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यामुळे मला मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करावी लागेल, त्यामुळे ही प्रक्रिया झाल्यानंतरच या पत्राबाबत मी प्रतिक्रिया व्यक्त करू शकेन, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी मनसे काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. अखेर आता मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. या निवडणुकीसंदर्भात राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपलं मत कळवलं आहे. या पत्रात ते म्हणाले होते की, “आमदार कै रमेश लटके य़ांच्या दुर्देवी निधनानंतर आज अंधेरी पूर्व या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. रमेश लटके हे एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखाप्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं त्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं,” असं राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केलं आहे.