मुंबई - काही नादान बोलतात, १५०० रुपयांत तुम्ही विकत घेऊ शकत नाही. बहिणीचं प्रेम कुणी खरेदी करू शकत नाही. १५ कोटी देऊनही हे प्रेम खरेदी करू शकत नाही. ज्या प्रेमाने आपल्याला ऊर्जा मिळतेय. त्या बहिणींना ओवाळणी म्हणून देण्याचा १५०० रुपये देण्याचा प्रयत्न आहे. दरवर्षी ही ओवाळणी आम्ही देऊ. राखी हे कवच आहे. हे कवच घेऊन पुन्हा मैदानात उतरणार आहे असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
मुंबईत आयोजित लाडक्या बहिणींचा देवाभाऊ या कार्यक्रमात फडणवीस उपस्थित होते. यावेळी अनेक महिलांनी देवेंद्र फडणवीसांना राखी बांधली. त्यात चिमुकलीही गर्दीतून वाट काढत स्टेजजवळ पोहचली तेव्हा सुरक्षा रक्षकांना सांगून फडणवीसांनी या चिमुकलीला व्यासपीठावर बोलावून घेतले. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज या सभागृहात जेवढी गर्दी आहे तितकीच सभागृहाबाहेर आहे. जर इतक्या मोठ्या संख्येने सभागृहात महिला जमल्या तर चेंगराचेंगरी होईल असं पोलीस म्हणाले. त्यामुळे या महिलांनी निराश होऊ नका, तुम्हाला या सभागृहात जागा मिळाली नसली तरी माझ्या हृदयात बहिणींसाठी जागा आहे. विकसित भारत घडवायचा असेल भगिनींना मुख्य धारेत आणल्याशिवाय भारत विकसित होऊ शकत नाही. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाहीत, स्वत:च्या पायावर उभं राहू शकणार नाही तोपर्यंत भारत विकसित होणार नाही. त्यामुळे मोदी सरकारने महिला केंद्रीत धोरण पुढे आले आहे. महिलांच्या जीवनात परिवर्तन होतंय. आता पुढच्या काळात २०२७ नंतर जितक्या निवडणुका होतील तिथे महिला प्रतिनिधित्व मिळणार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत १०० महिला प्रतिनिधी पाहायला मिळतील तर लोकसभेत त्याहून दुप्पट महिला प्रतिनिधित्व दिसेल असं त्यांनी सांगितले.
तसेच महिलांना एसटीमध्ये अर्ध तिकिट आम्ही दिले. महिलांची संख्या इतकी वाढली की तोट्यात असलेली एसटी फायद्यात आली. आज लाडक्या बहिणींना १५०० रुपये त्यांच्या खात्यात देतोय. लाडकी बहीण योजनेला विरोधक शिव्या श्राप देतात. योजनेविरोधात कोर्टात गेले. योजनेला कसा विलंब होईल असा प्रयत्न केला. आता ही योजना बंद होईल असं ते सांगतायेत. या सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका. या सरकारने ३१ मार्चपर्यंत निधीची तरतूद ठेवली आहे. तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार आल्यास ही योजना पुढे सुरू राहणार. महायुती सरकार असेपर्यंत ही योजना कुणीही बंद करू शकणार नाही. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले त्यांना १५०० रुपयांची किंमत कळणार नाही. हॉटेलमध्ये २ हजारांची टीप देणाऱ्यांना दीड हजारांची किंमत कळणार नाही. मात्र १५०० रुपयांत महिलांच्या कुटुंबाला हातभार लागेल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
दरम्यान, लाडका मुलगा, लाडकी मुलगी हीच योजना विरोधकांकडे आहे. मुख्यमंत्री झालं तर माझा मुलगा, माझी मुलगी असं त्यांचे आहे. मात्र राज्यातील सर्व महिला एक सोडून माझ्या भगिनी आहेत. आज महायुती सरकारने मुलींसाठी उच्चशिक्षण मोफत केले आहे. आज महिलांना वर्षाला ३ सिलेंडर मोफत देण्याचीही योजना आणली आहे. लेक लाडकी योजना आणली घरी मुलगी जन्माला आली तर सुरुवातीला ५ हजार आणि १८ वर्षापर्यंत १ लाख रुपये मुलीला मिळतील अशी योजना आणली आहे. राज्यातलं महायुती सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार असेल मी असेन, मंत्रिमंडळ असेल, आमदार असतील अहोरात्र तुमच्यासाठी काम करतोय. आज महाराष्ट्रात काही लोक बोलबच्चन देतात. जेव्हा देण्याची वेळ येते तेव्हा कुणी देत नाही. हे सरकार आले तर वसुली करतात. या लोकांची तोंड रावणासारखी आहेत. दहा तोंडाने खोटं बोलतात. मात्र रयतेची सेवा करणे हाच आपला धर्म आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.