Devendra Fadnavis : आम्ही हिंदू आहोत, दगडातही आमचा देव, पण; मंदिरं बंद असल्याने फडणवीस संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 06:22 PM2021-08-17T18:22:29+5:302021-08-17T18:38:39+5:30
देवेंद्र फडणवीस हे सांगोल्यात दिवंगत नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्याघरी सांत्वनपर भेटीसाठी गेले होते. त्यावेळी, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना, त्यांनी मंदिरे खुली करण्याची मागणी केली.
मुंबई : राज्य सरकारने 15 ऑगस्टपासून जवळपास राज्यात रात्री 10 वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्यास मुभा दिली आहे. त्यासोबतच, शॉपिंग मॉल आणि इतरही दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, अद्यापही सार्वजनिक कार्यक्रम आणि प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे, भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून वारंवार मंदिरे उघडण्यासाठी मागणी आणि आंदोलन करण्यात येत आहे. आता, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील मंदिरे खुली करावीत, असे म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस हे सांगोल्यात दिवंगत नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्याघरी सांत्वनपर भेटीसाठी गेले होते. त्यावेळी, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना, त्यांनी मंदिरे खुली करण्याची मागणी केली. आम्ही हिंदू आहोत, आमचे 36 कोटी देव आहेत, दगडातही आमचा देव आहे. 'मॉल, बारमध्ये जितकी गर्दी होते, त्यापेक्षा कमी गर्दी ही मंदिरात होते. दारूची दुकानंही सुरू आहेत. खरे तर सामाजिक अंतराचे निकष पाळून मंदिरं सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने तातडीने घेतला पाहिजे. अनेक गरिबांची उपजिविका त्यावर आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
मॉल, बारमध्ये जितकी गर्दी होते, त्यापेक्षा कमी गर्दी ही मंदिरात होते. दारूची दुकानंही सुरू आहेत. खरे तर सामाजिक अंतराचे निकष पाळून मंदिरं सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने तातडीने घेतला पाहिजे. अनेक गरिबांची उपजिविका त्यावर आहे. माध्यमांशी संवाद... pic.twitter.com/cUQMxfXhDX
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 17, 2021
तुषार भोसलेंचीही सरकारवर टीका
भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी मंदिर उघडण्याच्या मुद्यावरुन ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. अलीकडेच त्यांनी मंदिराच्या विषयावरुन ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला होता. सगळे खुले केले, मग मंदिर का बंद, अशी विचारणा करत मंदिर उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो, अशी टीका तुषार भोसले यांनी केली होती. साधू-संतांच्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारचं नाव काळया अक्षराने लिहिलं जाईल. कारण संस्कृतीचा सत्यानाश करण्याचे पाप या सरकारने केले आहे. ठाकरे सरकार म्हणजे दारु आणि बार अशीच या सरकारची ओळख झाली आहे, असेही तुषार भोसले यांनी म्हटले.