लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भीमा- कोरेगावप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष तपासण्याची परवानगी द्या, अशी मागणी करणारे पत्र वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भीमा- कोरेगाव चौकशी आयोगाला दिले आहे. त्याचप्रमाणे माजी मुख्य सचिव सुमित मलिक आणि माजी पोलिस अधीक्षक सुवेज हक यांचीही साक्ष तपासण्यासाठी व्यवस्था करावी, असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
जानेवारी २०१८ रोजी झालेल्या भीमा- कोरेगाव दंगलीप्रकरणी साक्ष नोंदविण्यासाठी ५ जून रोजी चौकशी आयोगाकडून बोलावण्यात आले होते. परंतु, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे चौकशीला हजर राहू शकत नसल्याचे आंबेडकर यांनी आयोगाला कळवले आहे. १४ व १५ जून रोजी मुंबईत असून, या तारखांना साक्ष ठेवल्यास मी हजर राहू शकेन, असेही त्यांनी आयोगाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
आयोगाची कार्यकक्षा ठरलेली आहे. राजकारणाची दिशा भरकटवण्यासाठी आणि दुसरीकडे लक्ष वेधण्याकरिता अशी विधाने प्रकाश आंबेडकर करत असतात, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.