फडणवीसांचे पवारांवर ट्विकास्त्र; भूमिका सलोखा बिघडवणारी!, सलग १४ ट्विट करत विविध मुद्द्यांवरून केला हल्लाबाेल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 05:38 AM2022-04-15T05:38:17+5:302022-04-15T05:38:33+5:30
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी तब्बल १४ ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली.
मुंबई :
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी तब्बल १४ ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली. कलम ३७० पासून लांगुलचालनाचे आरोप करत पवारांची विधाने फडणवीसांनी ट्विट केली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतात सामाजिक सलोख्याला बाधा आणणारी कृती करता येणार नाही, असेही फडणवीस यांनी सुनावले.
एकीकडे आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत आहोत. त्यांनी कलम ३७० ला विरोध केला होता. पण, आंबेडकरांच्या इच्छा आणि विचारसणीबद्दल काय बोलले गेले पहा, असे म्हणत फडणवीस यांनी पहिल्या ट्विटमध्ये पवार यांच्या कलम ३७० संदर्भातील वक्तव्याची बातमी ट्विट केली. यानंतरच्या सलग १३ ट्विटमधून त्यांनी पवारांना लक्ष्य केले.
असे ट्विट, असे आरोप
१. ‘नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर मलिक मुस्लिम आहेत, म्हणून त्यांचा संबंध दाऊदशी जोडला जातोय’, या पवारांच्या वक्तव्याची बातमी फडणवीसांनी ट्विट केली.
२. इशरत जहाँला केवळ निर्दोषच ठरविले नाही तर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी तिला मदतही केली. तसेच, त्याकाळी आयबीच्या अधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीने अपमान केला.
३. आघाडी सरकारच्या काळाता २०१२ मध्ये रझा अकादमीच्या आंदोलनात अमर जवान ज्योतीचा अवमान झाला. पण, गृहखाते सांभाळणाऱ्या राष्ट्रवादीने सौम्य भूमिका घेतली.
४. संविधानाच्या विरोधात जाऊन मुस्लिम कोटा आणण्याचा प्रयत्न झाला. शिवाय, ‘हिंदु दहशतवाद’ या शब्दाचे जनकत्वही पवारांकडे आहे.
५. सामाजिक सलोखा राखायचे असेल अशी दुटप्पी भूमिका का? अशी भूमिका आणि कृत्येच सामाजिक शांततेला बाधक आहेत.
ती विधाने पक्षाच्या भूमिकेनुसारच...
काश्मीर फाइल्स सिनेमाबाबत पवारांसह राष्ट्रवादी नेत्यांची विधाने ही लांगुलचालन आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या पक्षाच्या भूमिकेनुसार आली.
- देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट
ट्विट करून फायदा नाही
शरद पवारांवर टीका करणे हा आता सगळ्यांचा आवडता छंद झाला आहे. शरद पवार यांच्या राजकारण आणि समाजकारणातील भूमिका वर्षानुवर्षे लोकांना माहिती आहेत. अशा प्रकारचे ट्विट करून त्यात काही फायदा होईल, असे मला वाटत नाही. नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध जोडण्याचा प्रकार आधीही झाला होता. यात काही नवीन नाही.
- दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री