महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक आहे. हे सरकार तोडून-फोडून बनवले आहे. 2024 च्या निवडणुकीत जनता त्यांचे भवितव्य ठरवेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरातील कॉरीडॉर करणार या संदर्भात जास्त बोलले तर त्यांना उपमुख्यमंत्रीपद सोडावे लागेल, असा गौप्यस्फोट राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केला. सुब्रह्यण्यम स्वामी आज पंढरपूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला यावेळी हा गौप्यस्फोट केला. राम सेतू, तवांगमधील चीनची घुसखोरी, आर्थिक संकट, काशी विश्वनाथ मंदिर, पंढरपूर कॉरिडॉर या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.
'राम सेतूच्या मुद्द्यावर भाजपच्या केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे विश्वास उडाला आहे. आरएसएस त्याला राष्ट्रीय वारसा बनवण्याची चर्चा करते आणि भाजप त्याचे अस्तित्व मान्य करायला तयार नाही.सरकारने मंदिरे ताब्यात घेतली नाहीत तर भाजप मंदिरांवर सरकारचे नियंत्रण मागत आहे, अशी आरएसएसची भूमिका आहे. अशा परिस्थितीत 2024 मध्ये आरएसएस नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवणार का? हा प्रश्न मला पडला आहे, असंही सुब्रमण्यम स्वामी म्हणाले.
राहुल शेवाळेंविरोधात FB live करून रुपाली पाटलांनी 'त्या' पीडित महिलेला समोर आणलं
'चीन हल्ल्याच्या तयारीत आहे. ते आपल्या सीमेवर घुसखोरी करत आहेत आणि पंतप्रधान मोदी मीटींग घेत आहेत.चर्चा करण्याबद्दल बोलत आहे. राक्षसांसोबत काय चर्चा करणार? चीनला चर्चेची भाषा कळते का? चीन मदारीसारखा ढोल वाजवत आहे. घुसखोरीबाबत पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. किमान ते म्हणू शकतात की चीनने हल्ला केला आणि आमच्या सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले, असंही सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले.
चीनपुढे आपण झुकलो आहोत. पंतप्रधान मोदींबाबत मनात शंका निर्माण झाली आहे. ते आठ वर्षांत थकले आहेत का अस दिसत आहे. मोदी सरकार निवडणुकीच्यावेळी दिलेल्या अजेंड्यावर काम करत नाही. अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून मी अधिकाराने म्हणू शकतो की मोदी सरकारने अर्थव्यवस्था संकटात टाकली आहे. त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करून आपण लोकांसमोर जाऊ शकतो का?, असा सवालही सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केला.
सुब्रमण्यम स्वामी यांनी पंढरपूर कॉरिडॉरला विरोध केला. कॉरिडॉर होऊ देणार नाही, असंही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस जास्त बोलले तर ते उपमुख्यमंत्री राहणार नाहीत. पंढरपूरमध्ये विमानतळाची नितांत गरज आहे. चंद्रभागा नदीचे शुद्धीकरण अधिक महत्त्वाचे आहे, असंही सुब्रमण्यम स्वामी म्हणाले.