Join us

देवेंद्र फडणवीस लवकरच शरद पवारांची भेट घेणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 3:47 PM

शरद पवार यांनी मुंबईतील घरी आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. सध्या ते घरीच विश्रांती घेत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन शरद पवार यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली होती, तसेच विचारपूसही केली होती.

मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस लवकरच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. मात्र, ही भेट कुठल्याही राजकीय उद्देशाने नसून शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते शरद पवारांना भेटणार आहेत. शरद पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वीच पित्ताशयाशी संबंधित आजारवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर, सध्या ते घरीच विश्रांती घेत आहेत. 

शरद पवार यांनी मुंबईतील घरी आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. सध्या ते घरीच विश्रांती घेत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस शरद पवार यांची भेट घेणार आहेत. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात काही दिवसांपूर्वी पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यावेळी, देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन शरद पवार यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली होती, तसेच विचारपूसही केली होती. त्यानंतर, आता स्वत: भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस ते करणार आहेत. येत्या दोन दिवसांत ही भेट होणार असल्याचे समजते. 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या आरोपांना उत्तर दिलं. तसेच, राज्यातील कोविड परिस्थिती आणि लॉकडाऊनसंदर्भातही त्यांनी भाष्य केलं. 

राजेश टोपेंना लगावला टोला

राज्यात केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोरोना लशींचा साठा असल्याची माहिती आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. त्यावेळी टोपे यांनी केंद्राकडून लशींचा पुरवठा होत असला तरी त्यात वेग नसल्याचं म्हटलं. टोपेंच्या विधानावर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला टोला लगावला आहे. "राज्यातील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलण्यापेक्षा केंद्र सरकारशी संवाद साधावा. देशात सर्वाधिक लशीचा पुरवठा महाराष्ट्रालाच केला जात आहे", असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

लॉकडाऊन विरोधात उद्रेक होईल

राज्यात सातही दिवस १०० टक्के लॉकडाऊन असल्याचं चित्र आहे. विकेंडला दोन दिवस लॉकडाऊन आणि पाच दिवस कडक निर्बंध असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात सर्वच बंद करुन ठेवलं आहे. यामुळे राज्यातील लहान उद्योजक, छोटे व्यापारी आणि नागरिकांचा उद्रेक होईल याची काळजी सरकारनं घ्यावी, असा सल्ला फडणवीस यांनी दिला आहे. 

रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबवा

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याच्या मुद्द्यावरही फडणवीस यांनी सरकारवर ताशेरे ओढले. रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. त्यामुळेच तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडेसिवीर हे कोरोना काळातलं अत्यंत महत्वाचं औषध असताना राज्य सरकारनं याबाबत तात्काळ कारवाई करायला हवी, काळाबाजार रोखला गेला पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस