मुंबई - राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दि. 19 ऑक्टोबरपासून 3 दिवसांचा दौरा करणार आहेत. सध्या, बिहारमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस हे बिहारच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, या निवडणूक प्रचाराच्या धावपळीतही ते वेळ काढून दौरा करणार आहेत.
देवेंद्र फडणवीस 19 ऑक्टोबरला बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्या दिवशी, दि. 20 रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तिसर्या दिवशी दि. 21 रोजी हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील. या तीन दिवसांत 9 जिल्ह्यांमध्ये सुमारे 850 कि.मी.चा प्रवास ते करणार आहेत.
4.5 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
परतीच्या पावसाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राता कहर केला असून वरुणराजा आता बास रे... अशी म्हणण्याची वेळ बळाराजावर आलीय. शेतात कापणीला आलेली उभी पीकं पाण्याखाली गेली आहेत. सोयाबीन, कापूस, ऊस या पिकांचे मोठं नुकसान झालंय. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा व त्यातून निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे तीन दिवसांपासून अनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे. प्राथमिक अंदाजानुसार २३ जिल्ह्यांमधील काढणीवर आलेल्या साडेचार लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले. सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. तूर, भात यांच्यासह कापसाचेही नुकसान झाले आहे. उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर व बारामती या ४ ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरफ) तुकड्या तैन्यात केल्या आहेत. वायूसेना, नौदल, लष्कर यांना तातडीच्या मदतीसाठी हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनुष्यहानी टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत.
शरद पवार 2 दिवसीय दौऱ्यावर
शरद पवार दोन दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर असून उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा,औसा, परांडा, आणि उस्मानाबाद या भागांना भेटी देणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 18 व 19 ऑक्टोबर रोजी दोन दिवसांचा हा पाहणी दौरा असणार आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना शरद पवार यांच्या दौऱ्यातून काहीतरी हाती लागेल, अशी अपेक्षा आहे.