Join us

मुख्यमंत्र्यांची 'विश डिप्लोमसी'; शिवेसनेला दिल्या वर्धापदिनाच्या शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 1:54 PM

जनमत विरोधात जात असल्याची जाणीव भाजपा नेत्यांना झाली आहे.

मुंबई: शिवसेनेच्या वर्धापनदिनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा देत भाजपाशी युती न करण्यास अनुत्सुक असल्याचे दाखवून दिले. मात्र, त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र शिवसेनेची मनधरणी करताना दिसले. त्यांनी ट्विट करून शिवसेनेला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या या 'विश' डिप्लोमसीची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. देशभरात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांतील पराभवानंतर जनमत विरोधात जात असल्याची जाणीव भाजपा नेत्यांना झाली आहे. त्यामुळे राज्यातील भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेशी युतीची भाषा बोलायला सुरुवात केली होती. शिवसेनेने अनेकदा हा प्रस्ताव झिडकारूनही मुख्यमंत्र्यांसह भाजपाचे नेते युतीविषयी सकारात्मक दिसत आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीदेखील काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी शिवसेनेपुढे लोकसभा निवडणुकीत युती करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, उद्धव ठाकरेंनी अजूनही युती होणार की नाही, याविषयी भाष्य केलेले नाही.

राज्यातील सत्तापालटानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच शिवसेना नेतृत्त्वाशी कायम चांगले संबंध राखले आहेत. मध्यंतरीच्या काळात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाचे अनेक नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका करताना दिसले होते. यामुळे दोन्ही पक्षातील तणाव शिगेलाही पोहोचला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री वारीनंतर हा तणाव निवळतो, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशिवसेनाउद्धव ठाकरे