पूरग्रस्तांसाठी देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:02 AM2021-08-02T04:02:26+5:302021-08-02T04:02:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील पूरग्रस्त भागात तातडीने आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबतचे पत्र विरोधी पक्षनेते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील पूरग्रस्त भागात तातडीने आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबतचे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. तब्बल २६ मागण्यांचे पत्र फडणवीस यांनी पाठविले आहे. पुराच्या अनुषंगाने दीर्घकालीन उपाययोजनांच्या समग्र विचारासाठी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलाविण्याची मागणीही फडणवीस यांनी या पत्रात केली आहे.
पूरग्रस्त भागातील तीन दिवसांच्या दौऱ्यात फडणवीस यांनी सुमारे २६ ठिकाणी भेटी दिल्या होत्या. या भेटीदरम्यान पूरग्रस्तांशी केलेल्या चर्चेच्याआधारे फडणवीस यांनी २६ मागण्यांचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. यात १७ बाबींवर तातडीने, तर नऊ दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश आहे. शिवाय, २०१९ च्या पुरावेळी एनडीआरएफ निकषांच्या बाहेर जाऊन कर्जमाफी, किरायाचे पैसे, दुकानदारांना मदत असे अनेक निर्णय घेण्यात आले होते. पिकांच्या नुकसान भरपाईचे तीनपट पैसे देण्यात आले होते. पुराचे संकट आणि सध्याची कोरोनाची स्थिती पाहता, त्या आदेशात अधिकच्या सुधारणा करून तत्काळ मदतीचे आदेश काढण्याची मागणी फडणवीस यांनी केली आहे. तसेच, दीर्घकालीन उपाययोजनांबाबत जेव्हा-केव्हा आपण बैठकीचे नियोजन कराल, तेव्हा आम्ही उपस्थित राहूच, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
गाळ काढण्यासाठी रोखीने तथा बँक खात्यात तातडीने भरपाई द्यावी, नुकसानीचे मोबाईलने काढलेले फोटो हेच पंचनामा - पुरावा म्हणून ग्राह्य धरावेत, मृतांच्या कुटुंबीयांसाठी स्वतंत्र निधी, शेतसफाईसाठी रोख मदत, अन्न, वस्त्र, निवारा आणि औषधांसाठी त्वरित पावले उचलावीत, पशुधनासाठी भरपाई, दुकानदार, बारा बलुतेदार, टपरीधारक, हातगाडीवाल्यांनाही मदत द्यावी, मूर्तिकारांसाठी स्वतंत्र पॅकेज द्यावे, शेतकर्यांची वीजबिले माफ करावीत, वाहून गेलेली कागदपत्रे तयार करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशा तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
तसेच दीर्घकालीन उपाययोजना म्हणून कोकणातील जिल्ह्यांसाठी स्वतंत्र आपत्ती प्रबंधन यंत्रणा उभारावी, धोकादायक गावांचे मॅपिंग करावे, स्थिरीकरण प्रकल्पाला गती द्यावी, कमी पावसातही भीषण परिस्थिती निर्माण होत असल्याने त्याचा सर्वंकष विचार करून उपाय करण्याची मागणी फडणवीसांनी आपल्या पत्रात केली आहे.