देवेंद्र फडणवीसांचं 'पॉवर'फुल्ल विधान; "पवारसाहेब कधीही चुकीचा निर्णय करणार नाहीत"
By महेश गलांडे | Published: December 21, 2020 12:52 PM2020-12-21T12:52:40+5:302020-12-21T12:53:33+5:30
महाविकास आघाडी सरकारे उच्चाधिकार समिती स्थापन केलीय, त्या समितीच्या अहवालानुसार या मेट्रोचं 80 टक्के काम झालंय. आरे शेडमध्ये जे मेट्रो स्टेशन कारायचंय, त्याचही 100 कोटींपेक्षा जास्त काम झालंय
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नियोजित वेळेनुसार दुपारी 1 वाजता फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मेट्रो कारशेड आणि कांजूरमार्ग याबाबतही सविस्तर भाष्य करताना विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना प्रतिप्रश्न केले आहेत. तसेच या विषयासंदर्भात खासदार शरद पवार हे जर पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असतील, तर स्वागतच आहे. कारण, पवारसाहेब प्रॅक्टीकल आहेत, ते कधीही चुकीचा निर्णय करणार नाहीत, असे म्हणत फडणवीसांनी मेट्रो प्रकल्पाचा चेंडू शरद पवारांच्या कोर्टात टाकला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरुन राज्याचं होणारं नुकसान सांगत उद्धव ठाकरेंना अहंकारी असं संबोधलं होतं. उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हद्वारे फडणवीसांच्या अहंकारी टीकेला प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर, फडणवीस यांनी पुन्हा एकदा ही श्रेयवादाची लढाई नसून लोकांची दिशाभूल कशाला करता? असा सवाल उद्धव ठाकरेंना विचारला आहे. भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला? असा प्रश्न फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. तसेच, 30 मिनिटांच्या संवादातून एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अजूनही आपण महाविकास आघाडी सरकारच्याच उच्चाधिकार समितीचा अहवाल पूर्णतः वाचलेला नाही. एकदा हा अहवाल सार्वजनिक करा. प्रत्यक्ष स्थिती, भूमिका, वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. या समितीनेच सांगितले की कांजूरमार्ग येथे कारशेड नेल्यास किती मोठे आर्थिक नुकसान होईल. शिवाय 4 वर्षांचा विलंब वेगळा. कांजूरमार्ग येथे कारशेड करायचे असेल तरीसुद्धा आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल हे का लपवून ठेवता? असेही फडणवीस यांनी म्हटलंय.
प्रकल्पात केंद्राचाही वाटा
महाविकास आघाडी सरकारे उच्चाधिकार समिती स्थापन केलीय, त्या समितीच्या अहवालानुसार या मेट्रोचं 80 टक्के काम झालंय. आरे शेडमध्ये जे मेट्रो स्टेशन कारायचंय, त्याचही 100 कोटींपेक्षा जास्त काम झालंय. विशेष म्हणजे कांजूरमार्गच्या जागेचा उल्लेख करताना, आत्ता खर्चाचा बोजा पडेलच, शिवाय 2021 मध्ये होणारी मेट्रो 2024 सालापर्यंत मिळणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितलं. तसेच, हा केवळ राज्य सरकारचा प्रकल्प नसून केंद्राचाही 50 टक्के हातभार या प्रकल्पासाठी आहे. त्यामुळे, हा विषय प्रतिष्ठेचा करण्यात काहीच अर्थ नाही. कारण, आरेत बांधकाम केल्याशिवाय कांजूरमार्गला मेट्रो करताच येणार नाही, हे सत्य आपण का लपवतो, असा सवालही फडणवीस यांनी विचारला आहे.
शरद पवार प्रॅक्टीकल
या मेट्रो प्रकल्पात आम्ही भावनिकदृष्ट्या जुडलेलो आहोत, मेट्रो होऊ नये असं कोणाचंच मत नाही. मी स्वत: मेहनत करुन 80 टक्के टनलिंगचं काम त्या काळात पूर्ण केलंय. त्यामुळेच पवारसाहेब जर मोदींशी बोलून यासंदर्भात चर्चा करणार असतील, तर त्यांचं स्वागतच आहे. उद्धव ठाकरेंनीही मोदींशी चर्चा करावी. हे पहा, शरद पवार आणि आमचे कितीही वैचारिक मतभेद असले तरी, पवारसाहेब जेव्हा तो अहवाल वाचतील, तेव्हा ते प्रॅक्टीकल निर्णय घेतील, पवारसाहेब कधीही चुकीचा निर्णय करणार नाहीत, असा आशावाद फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.