मुंबई : त्रिपुरामध्ये न घडलेली घटना सोशल मीडियावर पसरविण्यात आली. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीदेखील यासंदर्भात ट्विट केले. आणि अचानक महाराष्ट्रात एके दिवशी वेगवेगळ्या शहरांत ५० हजारांचे मोर्चे निघाले. यात हिंदूंची दुकाने जाळण्यात आली. काँग्रेसची त्यावेळची लांगुलचालनाची भूमिकादेखील देशाला घातक ठरली आणि आजही तीच भूमिका देशाला घातक ठरत आहे. पूर्वी फक्त एक काँग्रेस होती; परंतु आता काँग्रेसप्रमाणेच लांगुलचालन करणारे इतर पक्षदेखील तयार झाले आहेत. महाराष्ट्रात निघालेले मोर्चे हा भारत अस्थिर करण्याचा प्रयोग होता, असे मत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या ‘वीर सावरकर : द मॅन हू कुल्ड हॅव प्रिवेंटेड पार्टिशन’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर, आमदार आशिष शेलार व अतुल भातखळकर उपस्थित होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, अमरावतीच्या घटनेबद्दल एकही सेक्युलरवादी बोलायला तयार नाही. मात्र दुसऱ्या दिवशी ज्यांची दुकाने जाळली गेली ते रस्त्यावर उतरल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. देशातील दंगली आणि अराजकता रोखायची असल्यास आपल्याला सावरकरांचे विचार आत्मसात करावे लागतील, असेही त्यांनी सांगितले.